Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीशिवसंपर्क अभियान नव्हे ते तर शिव्या संपर्क अभियान

शिवसंपर्क अभियान नव्हे ते तर शिव्या संपर्क अभियान

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा म्हणजे शिवसंपर्क अभियान नव्हे तर शिव्या संपर्क अभियान राबवले होते, अशी खिल्ली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडवली.

भाजपाचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टी केली. राज ठाकरेंवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाची आठवण करुन दिली. यावरुन आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.

“केमिकल लोचा ही मुख्यमंत्र्यांची सुसंस्कृत भाषा. मांडीला मांडी लावून नवाबभाई चालतात पण मराठीत मुन्नाभाई नाव असले तर चालत नाहीत. नवाबभाई चालतात कारण त्यांचा दाऊदशी संबंध आहे. १९९१ पासून आम्हाला जे संरक्षण आहे ही त्यांची कृपा आहे. दाऊदचा संबंध भाजपासोबत जोडायचा. आमचा काय संबंध दाऊदशी. केंद्र सरकारने सगळ्या कारवाया केल्या आहेत,” असे नारायण राणे म्हणाले.

२५ वर्षांपेक्षा जास्त काळ युती केली आणि मुख्यमंत्रिपदासाठी गद्दारी केलीत, असा आरोप नारायण राणे यांनी केला. अडीच वर्षात तुम्ही काय काम केले नाही. मंत्रालयात जायचे नाही, व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे भाषण, असे काम सुरु असल्याचा आरोप राणे यांनी केला. आता पुळचट शिवसैनिक असल्याचा आरोप राणे यांनी केला. शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी महाराष्ट्र उभा राहिला. तुम्ही त्यांचे नाव घेऊ शकत नाही, असे नारायण राणे म्हणाले.

१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर कुणी कसे पैसे घेतले हे पाहिलं आहे. नवाब मलिक यांना दाऊदशी संबंध दिसत असताना मंत्रिपदावरुन काढलं नाही, असा आरोप राणे यांनी केला आहे. संजय राऊत यांची संगत उद्धव ठाकरे यांनी भोवल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. ईडीची चौकशी झाली तर ती सुडानं करत असल्याचा आरोप केला जातो. तुम्ही लोकांच्या घरांवर कारवाया करत ते कसल्या भावनेनं करता, असा सवाल राणे यांनी केला. नारायण राणे यांनी यावेळी यशवंत जाधव यांचा दाखला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करा असं आवाहन केलं होतं. मात्र, राज्य सरकारनं केलं नाही. मुख्यमंत्र्यांना राजकोषीय तूट यातील काही कळत नाही. विकास कामांवर कसा पैसा खर्च करणार हे कळत नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

अडीच वर्षात किती चुली पेटवल्या?

गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी किती जणांच्या चुली पेटवल्या हे सांगावे? तुम्ही चुली पेटवणारे नाही तर चुली उद्धस्त करण्याचे काम केले आहे. तुम्ही मराठी तरुणाच्या हातात दगड दिले, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते असाही टोला त्यांनी लगावला. दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह यांना ठार मारले. यांनी जया जाधव आणि रमेश मोरे यांना का मारले, याची उत्तरं द्यावी, असे नारायण राणे म्हणाले.

राणे म्हणाले की, मी जवळपास ३९ वर्ष शिवसेनेत होतो. कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवणारे एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आता राज्याचे मुख्यमंत्री काय आणि कुठल्या भाषेत बोलू शकतात याचा अंदाज राज्यातील जनतेला आला आहे. कोण चूल पेटवते? तुम्ही अडीच वर्षात किती लोकांच्या चुली पेटवल्या? किती लोकांना नोकऱ्या दिल्या.

नारायण राणे म्हणाले की, १४ तारखेला फार मोठा गवगवा करून मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. शक्ती प्रदर्शन घेण्यासाठी सभा घेतली, पण सभा किती भरली आणि त्याला खर्च किती आला असेल याचा अंदाज नागरिकांना आला आहे. मुख्यमंत्री पदावर असताना जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली. यांना मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते. आतापर्यंत असंख्य मुख्यमंत्री झाले, त्यांनी राज्याची प्रतिमा वाढवायचे काम केले. हा इतिहास असताना परवाचे भाषण ऐकून वाईट वाटले. हे अपेक्षित नव्हते, असे ते म्हणाले.

नारायण राणे मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हणाले की, मुलगा म्हणून साहेबांना विश्वासदेखील दिला नाही. यांच्या हृदयात राम आहे की रावण? हे रामही नाही रावणही नाही. यांच्याकडे विकृत बुद्धीची लोक आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबद्दल बोलता, पण तुमचा चेहरा आरशात बघा, आम्ही तुम्हाला काय म्हणायचे?

हे म्हणतात शिवसैनिकानो तयार रहा. तुम्ही काय दिले अडीच वर्षात शिवसैनिकांना? लाखाची सभा तुमच्या नशिबी नाही तो काळ गेला. आम्ही मर्द आहोत हे यांना सांगावं लागतं. कुणी संशय व्यक्त केला का? असंही नारायण राणे म्हणाले.

शिवसेनेवर बोलणाऱ्यांना आम्ही अंगावर घेतले म्हणून तुम्ही आज मुख्यमंत्री झालात, आता भाजपच्या अंगावर येऊ नका, असा इशाराही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -