वाडा (वार्ताहर) : तालुक्यात बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, तानसा, पिंजाळ, देहर्जे, गारगाई या पाच नद्यांचे वरदान वाडा तालुक्याला लाभले आहे. शिवाय एक केंद्रीय राज्यमंत्री, एक खासदार, तीन आमदार असे लोक प्रतिनिधी असूनही या पाण्याचा लाभ तालुक्याला होत नाही. तालुक्याला पाणी मिळवून देणारे लोकप्रतिनिधी न मिळाल्यामुळे अनेक गावातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन वणवण फिरावे लागत आहे.
वाडा तालुक्यात १६८ खेडी व २०० हून अधिक पाडे आहेत. तर ८८ ग्रामपंचायती आहेत. आजमितीस तालुक्याची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक आहे. तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्येत वाढ होत आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी समस्येचे निराकरण होत नाही. मुबलक प्रमाणात पाणी तालुक्यात उपलब्ध आहे. परंतु या पाण्याचा लाभ तालुक्याला मिळवून देणारे लोकप्रतिनिधी न मिळाल्याने वाडा तालुका कोरडा आहे.
वैतरणेचे दररोज लाखो लिटर पाणी कोका-कोला कंपनी १५ किमी अंतरावरून घेते. मग पुरेसा निधी उपलब्ध केला तर येथील नागरिकांना ते का मिळू शकणार नाही, असा येथील नागरिकांचा प्रश्न आहे. नद्यांवर दहा किमी अंतरावर बंधारे बांधून पाणी अडविले तर केवळ पिण्याचाच नाही तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल. मात्र येथील लोकप्रतिनिधी क्रियाशील नसल्याने वाडा तालुका तहानलेला आहे. तालुक्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या परळी, ओगदा, वरसाळे, सागमाळ, घोडसाखरे, फणसपाडा, जाधवपाडा, दिवेपाडा या गावांना भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. औद्योगिकरण व त्यामुळे वाढलेल्या वस्तीला पाणी पुरवठा करणे ही गावांची समस्या बनली आहे. कारखानदारांना सरकारने पाणी दिले नाही.
त्यामुळे त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्चून उभारलेली कारखानदारी धोक्यात आली आहे. केवळ पाण्यामुळे उत्पादन कमी होत आहे, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. पालघर जिल्ह्यातील वाया जाणा-या पाण्याचा उपयोग करण्याचा प्रस्ताव येथील लोकप्रतिनिधीना सुचत नाही हे दुर्दैव आहे, अशी टीका शेकापचे सचिन मुकणे यांनी केली.