Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमी“शेअर बाजारात बाऊन्स बॅक अपेक्षित”

“शेअर बाजारात बाऊन्स बॅक अपेक्षित”

डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजारात या आठवड्यात देखील मोठी घसरण पाहावयास मिळाली. आपण आपल्या मागील ९ मे २०२२ च्या लेखातच अल्पमुदतीसाठी निर्देशांक करेक्शन अर्थात मोठ्या मंदीचे संकेत देत असून चार्ट देत असलेले संकेत पाहता येणारा आठवडा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. नेहमीप्रमाणेच तांत्रिक विश्लेषणानुसार केलेले आपले सगळे साप्ताहिक अंदाज योग्य ठरत आपण सांगितल्यानुसारच निर्देशांकात हालचाल झाली. २ मे २०२२ च्या लेखात आपण “कॅनफिन होम्स” या शेअरने अल्पमुदतीच्या चार्टनुसार या शेअरमध्ये पुढील काळात आणखी घसरण होणे अपेक्षित आहे” त्यामुळे पुढील काळात या शेअरमध्ये मंदीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल, असे सांगितलेले होते. या आठवड्यात देखील “कॅनफिन होम्स” या शेअरमध्ये आणखी मोठी घसरण पाहावयास मिळाली.

“कॅनफिन होम्स” या शेअरमध्ये या आठवड्यात ४५३ रुपये किमतीपर्यंत घसरण झालेली आहे. टक्केवारीत पाहायचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर २३ टक्क्यांची घसरण या शेअरमध्ये झालेली आहे. मागील आठवड्यात एल अँड टी इन्फोटेक अर्थात एलटीआय आणि माइंडट्री या दोन माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या विलीनीकरणाची घोषणा झाली. नवीन कंपनी आता “एलटीआयमाइंडट्री” या नावाने ओळखली जाईल. यांच्या एकत्रीकरणानंतर २२ अब्ज डॉलरची कंपनी तयार होईल. यानंतर माइंडट्रीच्या १०० शेअर्सच्या बदल्यात एलटीआयचे ७३ शेअर्स देण्यात येणार आहेत. या एकत्रीकरणानंतर पालक कंपनी एल अँड टीची ६८ टक्के हिस्सेदारी असेल. यांच्या एकत्रीकरणानंतर तयार होणाऱ्या भांडवल मूल्यानुसार ही कंपनी टेक महिंद्रा या कंपनीला मागे टाकून ५ व्या क्रमांकाची माहिती व तंत्रज्ञान कंपनी बनेल. या आठवड्यात एलआयसीची समभाग विक्रीची प्रक्रिया संपली. एलआयसीच्या आयपीओला प्रचंड यश मिळाले. या आयपीओसाठी गुंतवणूकदारांकडून जवळपास तिप्पट भरणा झालेला आहे. या आयपीओच्या यशस्वी बोलीनंतर १२ मे रोजी समभागांचे वाटप झाले.

मंगळवारी १७ मे रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. सलग दोन आठवडे निर्देशांकात मोठी घसरण झालेली आहे. याला कारणं निर्देशांकात सर्वाधिक योगदान असणाऱ्या रिलायन्स, इन्फोसिस, टीसीएससारख्या दिग्गज शेअर्समध्ये झालेली मोठी घसरण. सोबत विदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने केलेली विक्री हे आहे. देश-विदेशात सुरू असणाऱ्या प्रतिकूल घटना, वाढत असलेले कच्चे तेल, अमेरिकेतील बँकेकडून केलेली व्याजदर वाढ, यात सुरू असलेली विदेशी गुंतवणूकदारांची विक्री या सर्व घटकांचा परिणाम म्हणून रुपया हा पहिल्यांदाच नीच्चांकी पातळीला पोहोचला. रुपयाने या आठवड्यात ७७.१३ या पातळीला स्पर्श केला. महागाईचा भडका आणि व्याजदरात होत असलेली वाढ यातून पुढील काळात अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता आहे. सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा मंदीची असून तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसीस) मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार इंडस टॉवर, अॅक्सिस बँक, एमसीएक्स, सन टीव्ही, डिक्सन टेक्नोलॉजी या शेअर्सची दिशा अल्पमुदतीसाठी मंदीची झालेली आहे. शेअर बाजारात या एक महिन्यात मोठे करेक्शन झालेले आहे. याच्या परिणामी अनेक दिग्गज शेअर्समध्ये देखील जवळपास २० ते ३० टक्क्यांची त्यांच्या उच्चांकापासून घसरण झालेली आहे. शेअर बाजारात झालेली मोठी घसरण ही दीर्घमुदतीसाठी चांगली संधी आहे. पुढील आठवड्याचा विचार करता मोठ्या करेक्शननंतर काही काळासाठी शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक लागू शकतो. पुढील आठवड्यात निर्देशांक बाऊन्स बॅक करू शकतात. ज्यामध्ये निफ्टी १६४००, तर बँकनिफ्टी ३४५०० पर्यंत उसळी घेऊ शकतात. शेअर बाजारात पुढील काळात होणारी वाढ ही विक्रीचीच संधी असेल हे मात्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता जोपर्यंत निफ्टी १५७०० आणि बँकनिफ्टी ३२५००च्या वर आहे तोपर्यंत निर्देशांक मोठ्या मंदीनंतर तात्पुरती तेजी दाखवू शकतात. कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७७०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलात आणखी वाढ होऊ शकते. या आठवड्यात सोन्यात देखील घसरण झालेली आहे. त्यामुळे अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा आता मंदीची झालेली असून अल्पमुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५१५००या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यात मोठी वाढ होणार नाही.

निर्देशांकांनी मोठ्या मंदीचे संकेत दिलेले असल्यामुळे पुढील काळात शेअर्स खरेदी किंवा विक्री करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर करूनच व्यवहार करावेत. पुढील काळात निर्देशांकात होणाऱ्या घसरणीत दीर्घमुदतीसाठी योग्य शेअर निवडून निर्देशांकांची दिशा आणि गती बघून टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

samrajyainvestments@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -