Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीथॉमस कप : भारताची १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर मात

थॉमस कप : भारताची १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर मात

पंतप्रधान मोदींकडून १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर

नवी दिल्ली (हिं.स.) : तब्बल ७३ वर्षानंतर थॉमस कपच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारताने १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियाला मात देत चषकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक कामगिरी केली असून त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारताने इंडोनेशियावर ३-० ने विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टीव, किदम्बी श्रीकांत, एम. आर. अर्जुन, ध्रुव कपिला व एचएस प्रणॉय हे ठरले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे कौतुक केले असून १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

भारताने उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ असा थरारक विजय मिळवला होता, तत्पूर्वी त्यांनी मलेशियावर मात केली होती. उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारताने कांस्यपदक पटकावले होते, परंतु त्यांनी थेट सुवर्ण पदकावर नाव कोरले, हा ऐतिहासिक क्षण तर होताच पण यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सर्वांत आधी पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने सामना जिंकला. नंतर दुसऱ्या पुरुष दुहेरी सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू जोडी सात्त्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने विजय मिळवला. त्यानंतर नुकताच दुसऱ्या पुरुष एकेरी सामन्यात किंदम्बी श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीला मात देत सामना जिंकलाच, पण सोबतच भारताला ५ पैकी ३ सामने जिंकवून देत कपही जिंकवून दिला आहे.

आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतासमोर तगड्या इंडोनेशियाचे आव्हान होते. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने कडव्या संघर्षानंतर इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंटींगवर ८-२१, २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर लक्ष्यने दमदार पुनरागमन केले. ७-१२ अशा पिछाडीवरून लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये कमबॅक करताना २१-१७ अशी बाजी मारली आणि त्यानंतर निर्णायक गेममध्ये २१-१६ असा विजय मिळवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

दुहेरीत सात्विकराज रँकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. मोहम्मद अहसेन व केव्हिन संजया सुकामुल्जो यांच्या विरुद्धचा दुसरा गेम कमालीचा चुरशीचा झाला. पण, भारतीय जोडी वरचढ ठरली. सात्विक व चिराग यांनी हा सेट १८-२१, २३-२१, २१-१९ असा जिंकून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली.

आता उर्वरित तीन सामन्यांत भारताला एक विजय पुरेसा होता, तर इंडोनेशियाला तीन. त्यामुळे सर्वांचे लक्ष्य एकेरीच्या लढतीत स्टार किदम्बी श्रीकांत याच्यावर लागले होते. श्रीकांतचा सामना जोनाथन ख्रिस्टी याच्याशी होता, परंतु श्रीकांतने पहिला गेम २१-१३ असा जिंकून प्रतिस्पर्धीवर दडपण निर्माण केले. मात्र, इंडोनेशियाच्या खेळाडूने दुसऱ्या गेममध्ये चिवट झुंज दिली. ८-१२ अशा पिछाडीवरून त्याने १६-१३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर गेम १८-१८ असा आणखी चुरशीचा बनला. ख्रिस्तीने २०-१९ अशी आघाडी घेत गेम पॉईंट मिळवला, पंरतु श्रीकांतने २०-२० अशी बरोबरी घेतली. २२-२१ अशी आघाडी घेत श्रीकांतने गेम पॉईंट मिळवला आणि २३-२१ असा विजय मिळवून इतिहास घडवला. भारताने ३-० अशा फरकाने इंडोनेशियाला नमवून सुवर्णपदक नावावर केले.

तब्बल ७४ वर्षांनंतर प्रथमच थॉमस कपमध्ये अंतिम सामना खेळणे ही भारतासाठी फार मोठी गोष्ट होती. या विजयानंतर सर्वच स्तरातून भारतीय बॅडमिंटन संघावर कौतुकाचा वर्षाव होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

सहाच देशांना थॉमस कप जिंकता आला

आतापर्यंत केवळ सहाच देशांना थॉमस कप जिंकता आलेला आहे. त्यात सर्वाधिक १४ जेतेपद इंडोनेशियाच्या नावावर आहेत. त्याखालोखाल चीन १०, मलेशिया ५, जपान, डेन्मार्क (२०१६) आणि भारत (२०२२) यांच्या नावावर प्रत्येकी १ जेतेपद आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -