Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरबाटलीबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत मात्र खेळ आरोग्याशी

बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत मात्र खेळ आरोग्याशी

पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह, गैरफायदा घेत ग्राहकांची लूट

कासा (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्येसुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात बाटलीबंद पाण्याला ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. परिणामी, हा व्यवसाय तेजीत आहे. असे असले तरी शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ पाणी थंड करून विकण्याचा सपाटा काही व्यावसायिकांकडून सुरू आहे. पाणी शुद्ध केले जाते की नाही, पण बक्कळ पैसा कमावण्याच्या बाटलीबंद हव्यासापोटी अशुद्ध पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याचा खेळ होत आहे. पाण्याच्या बाटलीवर निर्मितीची तारीख टाकण्यास टाळाटाळ होत असल्याचे चित्र आहे. अनेक कंपनीचे पाणी मिनरल असते. तर, काही कंपन्या पॅकेजच्या नावाखाली बाटलीबंद पाणी विक्री करीत आहेत.

काही व्यावसायिक वापरलेल्याच बाटल्यामध्ये नळाचे पाणी भरून मिनरल वॉटरच्या नावाखाली विकत असतात. अनेक नागरिक पाणी शुद्धतेच्या मानांकनाबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्याकडून या बाबीकडे दुर्लक्ष होते. नेमका त्याचाच गैरफायदा घेत पाणीविक्रेते ग्राहकांची लूट करतात. पाणीविक्रीचा व्यवसाय ग्रामीण भागातही वाढला आहे. पाण्याची शुद्धताही तपासली जात नाही. केवळ पाणी थंड आहे म्हणून ग्राहक ते विकत घेतात. कोणत्याही हॉटेल, पानटपरीवर आता एक लिटर पाण्याची बाटली जवळपास वीस रुपयांना मिळते. अनेक हॉटेलचालक स्वतः च्या पाण्याच्या बाटल्या विकत आहेत. त्यात अनेक शीतपेय निर्मिती कंपन्याही बाटलीबंद पाण्याची विक्री करताना दिसत आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने पॅक बंद, कालावधी, स्वच्छता, मुदत यावर लक्ष दिले पाहिजे. मात्र, अनेक कंपन्या पाण्याच्या बाटलीवर असा उल्लेख करीत नाही. अस्पष्ट किंवा वाचता येणार नाही अशा पद्धतीने लिहिलेले असते. बाटलीबंद पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक असतो. तथापि परवाना न काढताच काही उद्योजक निर्मिती करतात. याकडे लक्ष दिले पाहिजे. नाहीतर एखाद्या दिवशी अशुद्ध पाणी पिण्यामुळे नागरिकाच्या आरोग्यावर परिणाम होईल.

सध्या बहुतेक नागरिक पिण्यासाठी पाणी म्हणून मोठ्या बाटल्या पाण्याच्या मागवत आहेत. ३० रुपये बाटली, थंड पाहिजे असेल तर ४० रुपयेप्रमाणे बाटली मिळत आहेत. ग्रामीण भागात हे पाणी कुठून आणले, कसे आणले हे न पाहता घेत आहेत. लग्न समारंभात तर सगळेच जण या पाण्याचा वापर करत आहेत. -आशिष चव्हाण, कासा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -