
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘‘उद्धव ठाकरे कालच्या सभेत म्हणाले होते, फडणवीस यांनी बाबरीवर पाय ठेवला असता, तर बाबरी पडली असती. मला त्यांना सांगायचे आहे, आज माझे वजन १०२ किलो आहे. बाबरी पाडायला गेलो होतो त्यावेळी माझे वजन १२८ किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझे राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न तुम्ही करीत असाल, तर हाच देवेंद्र फडणवीस ठाकरे सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणणारच, त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’’, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार करताना व्यक्त केला. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या हिंदी भाषिक उत्तर भारतीय संमेलनाच्या मंचावरून केलेल्या घणाघाती भाषणातून फडणवीस यांनी यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीचे जणू रणशिंगच फुंकले. बाळासाहेब ठाकरे हे पवारांना मैद्याचे पोते म्हणायचे. आज तुम्ही त्याच मैद्याच्या पोत्यावर डोके टेकलेय. त्यामुळे वजनदार माणसाशी जरा जपून... असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
उत्तर भारतीय संमेलनाच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर यावेळी टीकास्त्र डागले. मुख्यमंत्री बनून अडीच वर्षे झाली, पण एकदाही सरकारच्या कामावर, लोकांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री बोलले नाहीत. काल कौरवांची सभा होती, म्हणून तर शंभर सभांची बाप सभा होती, असे ते सांगत होते. पण आज पांडवांची सभा पार पडत आहे. कालच्या सभेत काही तेजस्वी, ओजस्वी ऐकायला मिळेल, असे वाटले होते. पण अख्खी सभा संपली पण ‘लाफ्टर’ काही थांबेना, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या सभेची खिल्ली उडवली. तसेच बाबरीवरून निशाणा साधणाऱ्या ठाकरेंनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. ‘रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता, असे म्हटले तर किती मिर्ची लागली. मै तो अयोध्या जा रहा था, बाबरी गिरा रहा था, मंदिर बना रहा था, तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू?’ असा गाण्यातूनही त्यांनी टोमणा मारला.
फडणवीस म्हणाले, हनुमान चालिसा तर आपल्या मनात आहे. मात्र रवी राणा आणि नवनीत राणा हे नादान आहेत. यांना माहीतच नाही हनुमान चालिसामधील दोन ओळी उद्धव ठाकरे आणि या सरकारला आधीपासून माहीत आहेत. ते फक्त त्याच दोन ओळींवर काम करत आहेत. काय आहेत या दोन ओळी तर, ‘राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे’... म्हणून फक्त २४ महिन्यांत ५३ मालमत्ता तयार झाल्या आणि यशवंत जाधव यांनी आपल्या मातोश्रीला ५० लाखांचे घड्याळही दिले. त्यांची मातोश्री म्हणजे त्यांची आई, चुकीची मातोश्री समजू नका, असा टोमणाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
अॅड. फडणवीस हा बाबरी पाडायला गेला...
१९९२ साली फेब्रुवारीमध्ये मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये मी वकील झालो... डिसेंबरमध्ये नगरसेवक व अॅड. फडणवीस हा बाबरी पाडायला गेला होता, असे फडणवीस म्हणाले. सहलीला चला... सहलीला चला... सहलीला चला, असे मुख्यमंत्री काल म्हणाले. पण नाही... लाठी गोली खायेंगे, मंदिर वही बनाऐंगे आणि आता मंदिर बनतेय, याचा आनंद आहे’, असे फडणवीस म्हणाले.
वाघाचे फोटो काढले म्हणून वाघ होता येत नाही...
वाघाचे फोटो काढले म्हणून कुणाला वाघ होता येत नाही. त्यासाठी निधड्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो. नुसती फोटोग्राफी करून वाघ होता येत नाही, असा टोला फडणवीस त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ठाकरे यांनी नेमका कुठला सामना केला, कोणत्या आंदोलनात होते, कुठल्या संघर्षात होते, असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे. तसेच कोरोना काळाच्या संघर्षात ठाकरे केवळ फेसबुक लाइव्हवर होते, आम्ही मैदानात अलाइव्ह होतो, असेही त्यांनी म्हटले.
मुंबई वेगळी करणार, पण भ्रष्टाचारापासून...
बोलायला काहीही नसले की, हे आपले एकच बोलायला लागतात. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणार... मुंबई वेगळी करणार. कोणाच्या बापाची औकात आहे मुंबई वेगळी करायची? आम्ही मुंबई वेगळी करणार ती महाराष्ट्रापासून नव्हे तर तुमच्या भ्रष्टाचारापासून, अत्याचारांपासून, अनाचारांपासून, दुराचारांपासून... असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांना कधी वाटलेही नसेल की, आपल्या मुलाच्या राज्यात हनुमान चालिसा वाचणाऱ्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो आणि औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवेसीला राजशिष्टाचार मिळतो, असेही ते म्हणाले.
मुंबईचा बाप एकच... छत्रपती शिवाजी महाराज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, आम्ही मुंबईचे बाप आहोत. हे कोण अनौरस बाप तयार झाले? या मुंबईचे, या महाराष्ट्राचे एकच बाप आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... अशा स्पष्ट शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला तसेच मुख्यमंत्र्यांना सुनावले.
धूर्त कोण असतो?
ते म्हणतात, बाळासाहेब भोळे होते. मी धूर्त आहे. होय, वाघ भोळाच असतो. धूर्त कोण असतो? मी नाव घेणार नाही. त्यांनी पातळी सोडली, मी सोडणार नाही, असे फडणवीस म्हणाले.