अर्चना सोंडे
ज्यांचा वर्तमान संघर्षमय असतो त्यांचं भविष्य सुवर्णमय असते असं एका तत्त्वज्ञाने म्हटलंय. मंजुळा वाघ यांचा उद्योजकीय संघर्ष पाहिला की हे तत्त्वज्ञान आपल्याला पटतं. आपल्या पतीला कर्करोग झाला आहे, हे ऐकून आभाळ कोसळलेल्या मंजुळा यांनी आपल्या सासरच्या आडनावाला सार्थ असा वाघासारखा परिस्थितीसोबत लढा दिला. दोन मुलांना सोबत घेऊन कॅटरिंग व्यवसाय सुरू केला आणि अवघ्या सहा वर्षांत दहाजणांना रोजगार देऊ लागल्या. ही संघर्षकन्या आहे मंजुळा रोहिदास वाघ.
मंजुळा मूळची नाशिकमधल्या सिन्नरची. सिन्नर तालुक्यात दोडी बुद्रुक येथे तिचं बालपण गेलं. वडील दादाजी धात्रक हे भारतीय हवाई सैन्यात अधिकारी होते. लष्करी शिस्त त्यांनी आपल्या चारही मुलांमध्ये बाणवली. सर्वांत मोठा गुण त्यांच्याकडून मंजुळाने जो घेतला तो होता लढण्याचा. कोणत्याही परिस्थितीला शरण न जाता दोन हात करण्याचा. दोडी बुद्रुकमधल्या न्यू ब्रह्मानंद हायस्कूलमध्ये मंजुळा १०वीपर्यंत शिकली. त्यानंतर काही वर्षांतच तिचा विवाह रोहिदास वाघ या तरुणासोबत झाला. लग्नानंतर मंजुळा नाशिकहून कांदिवलीला राहायला आली. लग्नानंतर वाघ दाम्पत्यांच्या संसारवेलीवर अमोल आणि आकाश अशी दोन फुले उमलली.
रोहिदास वाघ हे चार्टर्ड अकाऊंटंटच्या ऑफिसमध्ये ऑफिस असिस्टंट म्हणून कार्यरत होते. सुरुवातीला पगार अगदीच तुटपुंजा होता. मात्र जीवनसाथी बनलेल्या मंजुळाची भरभक्कम साथ होती. दुर्दैवाने वाघ ज्या कार्यालयात काम करायचे तेथील मालकाचं निधन झालं आणि त्यांची नोकरीच गेली. त्यावेळेस अमोल १०-१२ वर्षांचा होता, तर आकाश ८-१० वर्षांचा. आपल्या वडलांची नोकरी गेली म्हणजे काय हे कळण्याचं देखील वय नव्हतं. अशा वेळी मंजुळाने कंबर कसली. आपल्या बछड्यांसाठी ती नोकरी करायला लागली. कांदिवलीला तिचं ऑफिस होतं. कालांतराने तिची बदली वांद्र्याच्या ऑफिसला झाली. अवघा ७-८ हजार रुपये पगार. मात्र या माऊलीने आपल्या मोठ्या मुलाला इंजिनीअरिंगला पाठवले. त्याचा शिक्षणाचा खर्च परवडणारा नव्हता. मात्र मंजुळा प्रचंड कष्ट घेत होत्या.
याचदरम्यान दुर्दैव आड आलं. मंजुळा यांना अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालं. संकटे आली की ती अशी चारही बाजूंनी येतात. मंजुळाची नोकरी गेली. दोन-अडीच महिने त्यांना घरात रहावं लागलं. पोटापाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आणि अशातच शत्रूच्या वाटेला येऊ नये, अशी घटना मंजुळाच्या आयुष्यात घडली. रोहिदास वाघ यांना कर्करोगाचे निदान झाले. मंजुळाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. शेवटच्या टप्प्यावर हा आजार गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. धीर खचून चालणार नव्हतं. रेडीओथेरपी, केमो या सगळ्या कर्करोगरुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारपद्धती सुरू करणे गरजेचे होते. महत्त्वाचं म्हणजे हे उपचार खर्चिक होते. कशीबशी खर्चाची जुळवाजुळव सुरू होती. यातून त्यांना मार्ग दिसला तो उद्योगाचा.
त्यांच्या परिसरात सह्यादी इंडस्ट्रियल इस्टेट आहे. येथे काम करणाऱ्या कामगारांना सकाळचा नाश्ता लागतो. ते पुरविण्यास मंजुळा यांनी सुरुवात केली. शिरा, पोहे, साबुदाणा, खिचडी असा नाश्ता सकाळी तयार करून त्या विकू लागल्या. मंजुळा यांच्या हाताला चव असल्याने हे पदार्थ सकाळी हातोहात खपू लागले. अमोल आणि आकाश ही दोन्ही मुले त्यांना मदत करायचे. काहीवेळेस वेगवेगळ्या ऑफिसमधून ऑर्डर्स असायच्या. त्या ऑफिसमध्ये पोहोचविण्याचं काम अमोल करायचा. यातूनच जेवणाच्या डब्ब्यांची विचारपूस व्हायला लागली. मग जेवणाचे डब्बेदेखील पुरवू लागले. हळूहळू व्यवसाय आकार घेऊ लागला. शिर्डीचे साईबाबा आणि आराध्यदैवत असणाऱ्या गणपतीवर वाघ कुटुंबाची श्रद्धा असल्याने या दोन्ही देवतांच्या नावाने ‘साई गणेश टिफिन सर्व्हिस’ सुरू झाली.
आता साई-गणेश टिफिन सर्व्हिसेसचे नाव दुमदुमू लागले होते. टिफिन घेणारे आता त्यांच्या घरी होणाऱ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी भोजन बनवून द्याल का, अशी विचारणा करू लागले. यातून केटरिंग सर्व्हिस सुरू झाली. आतापर्यंत शेकडो घरगुती, कॉर्पोरेट, विवाह समारंभांना साई गणेश टिफिन सर्व्हिसेसने केटरिंग सेवा दिली आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पद्धतीते ८ ते १० लोकांना रोजगार देते. यामध्ये ५ महिलांचा समावेश आहे हे विशेष. याव्यतिरिक्त केटरिंग सर्व्हिसेच्या वेळी महाविद्यालयीन मुलांना काम दिले जाते. जेणेकरून अर्थार्जनातून त्यांच्या शिक्षणास हातभार लागेल. मंजुळा वाघ यांनी या सेवा पुरविण्यासाठी एक दुकान देखील घेतले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्यांना ते दुकान बंद करावे लागले. सध्या ७०-८० टिफिन सेवा सुरू आहे. कोरोनापूर्व काळात ही संख्या १००च्या घरात होती. हजारच्यावर उपस्थिती असणाऱ्या समारंभास सेवा देण्याची त्यांची क्षमता आहे. भविष्यात मसाले उद्योगात उतरण्याचा मंजुळा वाघ यांचा मानस आहे.
माणसाच्या शिक्षणावर त्याची प्रगल्भता मोजू नये, तर कठीण परिस्थितीला तो कसा सामोरे जातो याकडे पाहावे. हा निकष मंजुळा वाघ यांना लावल्यास प्रगल्भतेमध्ये त्यांनी पीएचडी केली असं म्हणावं लागेल. त्यांचा मोठा मुलगा अमोल याने आयटीमध्ये अभियांत्रिकेची पदवी प्राप्त केली आहे आणि एका आयटी कंपनीत नोकरीस आहे, तर धाकटा मुलगा आकाश वाणिज्य शाखेच्या पदव्युत्तर पदवी वर्गात शिकत आहे. तो आईला व्यवसायात मदत करतो. रोहिदास वाघ यांचे या वर्षाच्या सुरुवातीला कर्करोगाने निधन झाले. मंजुळा मात्र खऱ्या अर्थाने वाघ नाव सार्थ करत कॅटरिंग व्यवसायात पुढे झेपावत आहे. खऱ्या अर्थाने ही संघर्षकन्या लेडी बॉस आहे.