रमेश तांबे
एक होता ससा, विचारा ना कसा? सांगतो ऐका बरे, रूप त्याचे खरे!
पांढऱ्या शुभ्र रंगाचा
लांब लांब मिश्यांचा
लाल लाल डोळ्यांचा
अन् मोठ-मोठ्या कानांचा!
तो हिरव्यागार गवतातून दुडूदुडू धावायचा. खाता खाता गवत हिरवे, टकामका बघायचा. भल्या मोठ्या कानातून तो सारं काही ऐकायचा, चाहूल लागताच कुणाची अंधाऱ्या बिळात लपायचा!
एके दिवशी शंकर देव
त्याला येऊन भेटले
त्याच्याबद्दल त्यालाच
माहिती सांगू लागले.
देव म्हणाला, “ससुल्या असा कसा रे तू घाबरट. जरा काही हललं, जरा काही वाजलं वेड्यासारखं पळत सुटतोस, अंधाऱ्या बिळात लपून बसतोस. थांब आता तुला मोठी शक्ती देतो अन् एक वर्षांनी तुला पुन्हा येऊन भेटतो.”
देव जाताच सशाने, शक्ती त्याची वापरली. जंगलातली प्राणी जनता खूप खूप घाबरली. ससा झाला खूप मोठा अन् झाला ताकदवान! सगळ्यांना म्हणाला, “मी तुमचा राजा करा मला सलाम!”
आता ससा झाला राजा
त्याची रोज रोज मजा
वाघ त्याच्या दरबारात
वारा त्याला घाली
अन् सिंह त्याला हवे तेव्हा
पाणी आणून देई!
तरस, कोल्हे, लांडगे
त्याच्या पुढे नाचायचे
ससा देईल तेच
मिटक्या मारीत खायचे!
हत्ती आपल्या सोंडेने अंघोळ त्याला घालायचे अन् मानेवर बसवून जिराफ मिरवून त्याला आणायचे. पक्ष्यांचा राजा गरुड रक्षक होता त्याचा. कोकीळ त्याच्यासाठी गोड गाणी गायचा!
मोरपिसांचा किती छान, मुकुट होता त्याचा, सणासुदीला पोशाख होता, रंगीबेरंगी फुलांचा! रोज सकाळी झाडाखाली दरबार त्याचा भरायचा, ससे महाराज की जय जयजयकार चालायचा.
दिवसा मागून दिवस गेले
ससे महाराज पार विसरले
शंकर देवांनी आपल्याला
काय बरे सांगितले
एके दिवशी दरबारात ससे महाराज रागावले. सगळ्यांसमोर वाघाला हवे तसे बोलले. वारा नीट घालत नाही कामचुकारपणा करतो. पलीकडच्या सिंहाशी गप्पा मारीत बसतो. पंचवीस फटक्यांची शिक्षा जाहीर झाली वाघाला, फटके मारण्यासाठी झेब्रा हसत हसत पुढे आला. झेब्रा म्हणाला वाघाला, “आपण दोघे पट्टेवाले जसे दोघे भाऊ, तरी खातोस मला तू समजून मस्त खाऊ! थांब आता मी तुला बघतोच, सगळा राग आता
तुझ्यावर काढतोच!”
झेब्रा फटके मारीत होता,
सारा दरबार हसत होता,
हरणे मजा बघत होती,
तर माकडे उड्या मारीत होती,
मार खाऊन वाघाचे
डोळे झाले लाल,
जोरदार डरकाळीने
थरथरले सारे रान!
मग सशासकट सगळे प्राणी खूप खूप घाबरले, ससे महाराज बसल्या जागी घामाने भिजले! मग स्वतःला सावरत ससा म्हणाला, मी आहे जंगलचा राजा, तुम्ही सारी माझी प्रजा. वाघाला मी शिक्षा देईन जंगलातून पार हाकलून लावीन.
पण एक पंजा मारताच वाघाने, पाच फूट ससा उडाला, कसाबसा पळत पळत बिळात जाऊन लपला. सगळा दरबार उधळला, सर्वत्र गोंधळ उडाला!
एक वर्ष पूर्ण झाले
ससे महाराज पुन्हा भित्रे झाले
असे कसे झाले, असे कसे झाले?
अहो, सशाला भारीच
स्वप्न पडले!