Categories: कोलाज

पोसायडनचे ऐकायला हवे

Share

अनुराधा परब

संस्कृती ही कधीही एकसाची नसते. सातत्याने ती बदलत असताना तिच्यामध्ये देवाण-घेवाणीची प्रक्रियाही सुरूच राहते. एका प्रदेशात नांदत असलेली संस्कृती ही स्थानिक उपलब्ध साधनांच्या अंगाने विकसित झालेली असते. या संस्कृतीशी बाहेरून कोणत्याही कारणाने अन्य संस्कृती येऊन मिळत असल्यास त्यामध्ये होणारी घुसळण ही नव्या गोष्टींना आकार देत असते. कोकण किनारपट्टीच्या माध्यमातून होणारा व्यापार हा याला पूरकच ठरला. सागरी मार्गाने आलेल्या व्यापाऱ्यांनी नेहमीच काही केवळ आणि केवळ व्यापारी हेतूने या भागात आपले बस्तान बसवले नाही. यांच्यातील काहींनी तर वर्चस्वासाठी धर्मांतराची मोहीमही मोठ्या प्रमाणावर राबविल्याचा इतिहास सुस्पष्टच आहे. या व्यापाऱ्यांमार्फत त्यांचे धर्म, भाषा, विचार एकुणातच संस्कृती सोबत आली आणि ती रुजवण्याचा प्रयत्नही केला. स्थानिक संस्कृतीमधील रुचलेल्या, पटलेल्या गोष्टी त्यांनीही आत्मसात केल्या. या सगळ्यांचा परिणाम परस्परांच्या राहणीमानावर, खानपानावर, रूढी-परंपरांवरही होत गेल्याचे आपल्या निदर्शनास येते.

कोकण किनारपट्टीवरील प्राचीन नैसर्गिक बंदरांमध्ये चिंचणी-तारापूरपासून ते डहाणू, कल्याण, शूर्पारक, वसई, रायगड जिल्ह्यातील म्हसळे; रत्नागिरीतील जयगड, खेड तर सिंधुदुर्गातील देवगड आणि विजयदुर्ग या प्रमुख बंदरांचा समावेश होतो. याचे संदर्भ टोलेमीच्या प्रवासवर्णनात तसेच पेरिप्लस ऑफ एरिथ्रिअन सी या ग्रंथातही सापडतात. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून व्यापाराकरिता प्रसिद्ध असलेल्या कोकण किनारपट्टीवरील व्यापार हा नेमका कशा कशाचा आणि कुठपर्यंत होत होता, त्याबद्दलही बरीच माहिती विविध साधनांमधून हाती येते. भारतातून विदेशामध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये काळीमिरी, वेलची, दालचिनी, चिनी दालचिनी, उत्तम प्रतीचे अत्तर, चंदन, मसाल्याचे पदार्थ, धातू, औषधे, वनौषधी, चामडे तयार करण्यासाठी लागणारी जनावरांची कातडी, चंदन आणि हस्तिदंती नक्षीकाम केलेल्या वस्तू, तलम सिल्क कापड, मोती आणि अनेकविध मौल्यवान खनिजे यांचा समावेश होता. याचबरोबर प्राण्यांची निर्यातही केली जात होती. त्यात कावळे, पोपट, मोर, माकडे आदींचा समावेश होता. इजिप्तमधील प्राचीन राजाच्या कबरीमध्ये काळिमिरी सापडली आहे. ती सुमारे इसवीसन पूर्व १२०० शतकांतील आहे. एवढा हा व्यापार जुना आहे. कोकण किनारपट्टीचा व्यापारी वापर असा उल्लेख ज्या ज्या वेळेस येतो त्या त्या वेळेस टोलेमी आणि इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतात येणाऱ्या युरोपिअन व्यापाऱ्यांसाठी लिहिले गेलेले पेरिप्लस ऑफ एरिथ्रिअन सी हे मार्गदर्शक पुस्तक यांचा हमखास उल्लेख केला जातो. आजवरच्या अभ्यासात संशोधकांना असे लक्षात आले आहे की, भृगुकच्छ म्हणजेच गुजरातमधील भडोच किंवा भरूच आणि शूर्पारक म्हणजे सोपारा ही भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील आंतरराष्ट्रीय बंदरे होती. त्या खालोखाल रायगड जिल्ह्यातील चौलच्या बंदराचाही समावेश होता. आजवर अनेकांनी पेरिप्लसमध्ये नामोल्लेख असलेली बंदरे नेमकी कोणती याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही नामसाधर्म्यामुळे सुस्पष्ट झाली. जसे की, शूर्पारक-सोपारा, चेमूला-चौल. मात्र अनेक नावांबाबतीत आजही ठिकाण निश्चिती झालेली नाही. तिथे केवळ संशोधकांनी अंदाज व्यक्त केले आहेत.

उदाहरणार्थ, मँडागोरा म्हणजे कुडा-मांदाड असण्याची शक्यता. नामसाधर्म्य नसलेल्या बंदरांमध्ये देवगड, राजापूर, विजयदुर्ग, मालवण यांचा समावेश असावा, असे संशोधकांना वाटते. पेरिप्लस, टोलेमी यातील वर्णनानुसार सोपाऱ्याला उतरून व्यापारी कल्याणमार्गे नाणेघाट चढून जुन्नरच्या तत्कालिन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जात असत. तिथून काही व्यापारी डावीकडे जात पैठण गाठत, तर काही व्यापारी जगातील सर्वात मोठे दागिने निर्मिती केंद्र असलेल्या आणि दक्षिणेची मथुरा म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या प्रस्तुत उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या ठिकाणी पोहोचत.

आजवर संशोधकांनी असेच म्हटले आहे की, ते परतीचा प्रवासदेखील आलेल्या मार्गानेच करत असत. नेमके याच ठिकाणी संशोधक अभ्यासक म्हणून काही महत्त्वाचे प्रश्न पडतात. सोपाराहून जुन्नरमार्गे तेर हे साधारणपणे सव्वापाचशे किलोमीटरचे अंतर आहे. मात्र प्रत्यक्षात तेरहून कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गाची किनारपट्टी गाठल्यास ते अंतर केवळ ४४० किलोमीटर एवढेच आहे. मानवी स्वभाव हा नेहमीच कमीत कमी कष्ट घेण्याचा असतो. हाच नियम लागू केल्यास तेरला आलेले व्यापारी सिंधुदुर्गातील बंदरांतून परतीचा प्रवास करणे निश्चितच श्रेयस्कर समजतील. खरे तर ही इतकी साधी बाब (कॉमन सेन्स) आहे की, ती सहजच लक्षात यायला हवी. मात्र असे म्हणतात की, कॉमन सेन्स ही कॉमन नव्हे, तर दुर्मीळ अशी गोष्ट झाली आहे.

खरे तर कोल्हापूर येथे ब्रह्मगिरीच्या उत्खननामध्ये ग्रीक समुद्रदेवता असलेल्या पोसायडनची मूर्ती सापडली. ही मूर्ती आपल्याला सिंधुदुर्गातील बंदरांची गोष्ट आणि उपयुक्तता सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तरीही आजवर पुराविदांचा सगळा विचार हा सोपारा, चौल या बंदरांमध्येच अडकलेला आहे. कदाचित त्या ठिकाणी झालेल्या उत्खननामध्ये सापडलेल्या पुराव्यांमुळे पुराविदांनी तेवढाच सीमित विचार केला असावा. मात्र पुरातत्त्वशास्त्रात असे सांगते, की एखाद्या ठिकाणी पुरावा सापडला नाही याचा अर्थ तो अस्तित्वातच नाही असे नाही. किंबहुना, त्या पुराव्याचा शोध घेणे आवश्यक आहे. आजपर्यंतचा इतिहास असे सांगतो की, पुराविदांनी सिंधुदुर्गावर एक प्रकारे अन्यायच केला आहे. हा अगदीच मागास प्रांत असल्याने इथे फारसे काही सापडण्याची बिलकूल शक्यता नाही, अशा टिप्पणी अनेक पुराविदांनी विविध ठिकाणी केलेल्या आहेत. आता गरज आहे ती सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीकडे, बंदरांकडे तसेच सागरी व्यापाराकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची…

anuradhaparab@gmail.com

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

4 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

4 hours ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

4 hours ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

5 hours ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

5 hours ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

5 hours ago