Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमाझ्या आठवणीतील माणसं...

माझ्या आठवणीतील माणसं…

डॉ. स्वप्नजा मोहिते

यूँ नजर के सामने जिंदगी गुजर जाती हैं…
की लम्हो के साये निकल जाते हैं…
हर राह मुड जाती हैं न जाने कहाँ…
परछाइयाँ गिनते हम रह जाते हैं…
यादों के परदे ओढे,
जिंदगी जब करवट बदलती हैं…
मेरे ख्वाबों

की दुनिया फिर नयी सी, बस जाती हैं! किती नवी स्वप्न जन्म घेतात प्रत्येक नव्या दिवसाला! वर्ष सरत जातात आणि नव्या पहाटेच्या प्रतीक्षेत, आपण चालत राहातो. वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस केवळ… आणि अगणित आठवणी!

आठवणींचं पुस्तक उघडून बसलेय. किती आठवणी गोळा झाल्यात मनात? एक थरथरता आवाज आठवतो. माझा लेख आवडला हे सांगण्यासाठी नातवाकडून फोन लावून घेतलेला त्या आजोबांनी. कधी कोल्हापूरला आलीस तर नक्की ये; त्या आवाजातली माया पार मनाच्या तळापर्यंत झिरपत गेलेली! मॅडम, मी एक माजी सैनिक आहे. आता चर्चगेटला छोटंसं हॉटेल सुरु केलंय. पावभाजी खायला या नक्की! तुमच्या लेखांसाठी माझी छोटी भेट! असाच एका रात्री आलेला हा फोन. पोरी खूप छान लिहितेस! असंच लिहीत राहा. तुझ्या लेखात मला माझं आयुष्य सापडलं! त्यांच्या आवाजातील ओल मला फोनमधून ही जाणवली. कोण कोण कुठून फोन करतात, भेटायचंय म्हणून सांगत राहतात. तुम्हाला वेळ आहे नं बोलायला? विचारणाऱ्याच्या मनाचं एकटेपण मला इतक्या अंतरावरूनही जाणवतं. हो मावशी… बोला नं! हातातली कामं बाजूला ठेवून मी ऐकत राहते कोणाकोणाच्या कहाण्या! कोणी रिटायर्ड शिक्षिका, कोणी भजनात मन रमवू पाहणारी, कोणी शेताच्या बांधावर बसून माझा लेख वाचणारा, कोणी आयुष्याच्या टप्प्यावर एकटा उरलेला, कोणी फेसबुकवर मला शोधून द्यायला मित्राला गळ घालणारी तर कोणी माझ्या लेखांची कात्रण जपून ठेवून, त्यांच्यावर भरभरून बोलणारा, व्हॅट्सअॅपवर लेख आवडल्याची पोचपावती देणारा आणि ताई, आम्हा म्हाताऱ्यांसाठी तू एक गोष्टींची शाळा काढ म्हणून सांगणारं कोणीतरी! माझ्या फोनबुकमध्ये अशा माझ्या माणसांचे कॉन्टॅक्ट जमा होत जातात. माझ्या अलमारीतला एक कप्पा त्यांच्या पोस्टकार्ड्स, ग्रीटिंग्स आणि असंख्य प्रकारच्या हस्ताक्षरांतल्या पत्रांनी भरून जात राहतो. जुनी झाली तरी ती पत्रं मला फाडून टाकवत नाहीत आणि फोनबुकमधले कॉन्टॅक्टस डिलीट होत नाहीत! इतकी माणसं जोडलीत मी आणि जपल्यात त्यांच्या आठवणी मनात! एकटी असले की मनाचे सारे कप्पे उघडतात आणि न बघितलेली तरीही माझी असलेली ही माणसं मला सोबत करत राहतात. मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंत ते पार सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत… आणखी कुठे कुठे विखुरलेल्या माणसांचं एक माझं जग, माझ्याभोवती गोळा होतं. खरं तर मी काय लिहिते? कुछ अल्फाज यूँही उतरते हैं… स्याही के रंगो के कई सपने निखरे ही जाते हैं पलको पे, अंजाने से… और मेरे आँसू भी तब महक उठते हैं, हल्केसे…. कभी सोंधी मिट्टी की, कभी जुही सी, कभी चंपा की भिनी खुशबू ले कर…. जब बारिश की कुछ बुंदे मेरे हथेलिओं पे सजती हैं! जिंदगी तू यूँही जिये जा… के कुछ सपने रंगीन सजाये जा… राहबर तू रहे ना रहे… तेरे अल्फाजोंको किसी के दामन में सजाये जा!!

बस अपना तो यही फंडा हैं! सुचेल तसं लिहीत राहायचं. हे लिहीत जाण्याचं वेड मला कधी लागलं… कोण जाणे! पण मनाची आठवणींची आलमारी भरत गेली खूप आणि त्या आठवणीच सांगायला लागल्या… लिही आमच्याबद्दल! जिंदगी की अलमारी में कुछ सुखे पत्ते, कुछ टुटे खिलौने रखे थे कबसे… और कुछ नगमे यूँही पडे थे अंधेरे से. कही कोने में… बचपन की यादे और जवानी के कई सपने संजो के रखे थे… शायद मेरी मुस्कराहट भी रखी थी छुपा के, कही मैंने … और काँच के रंगीन टुकडे, रंग बिखेरते… मुझ से कभी खो गये से… जब अंधेरी अलमारी में झाँक कर देखा अकेले में मैंने… तो कई यादे बिखरसी गयी, टूटे घुंगरूंओंकी तरहा… और फिर से पाया मैंने, मुझी को… बिखरे हुए!

या आठवणीतली अशीच एक सुंदर सोनसळी संध्याकाळ आठवली. आजीचा सुरकुत्यांनी भरलेला चेहरा आठवला. ते रेशमी मावळतीचं ऊन तिच्या प्रत्येक सुरकुतीत उतरलेलं. तिचा थरथरता हात पाठीवरून फिरला माझ्या, तेव्हा अख्खं आभाळ माझ्या मनात उतरलेलं. तिच्या मऊसूत पदरात स्वतःला गुरफटून घेत, मी तिच्या मांडीवर डोकं टेकवलं, तेव्हा ती किती बारीक झालीय ते जाणवलं. तिला कॅन्सर झालाय. घरातली कुजबुज माझ्या कानावर पडली होती. पण कॅन्सर म्हणजे नक्की काय, हे समजण्याचं वय नव्हतं माझं. तरीही… आय नो… धिस इज समथिंग व्हेरी सिरियस… व्हेरी अनक्युरेबल! आजी, गोष्ट सांग नं! माझा हट्ट आणि मग ती सांगत राहायची, तिच्या आयुष्याची गोष्ट! तिच्या नजरेतून माळ दिसायचं तिचं जग… मुला – माणसांशी जोडलेलं… सणावारांना बांधलेलं! दिसायचं ते भलंमोठ्ठ घर, त्यातल्या बाळंतिणीच्या खोलीपासून ते बाहेरच्या ओटी – पडवीपर्यंत!

त्या बाळंतिणीच्या खोलीमध्ये माझी अशी एक जागा होती… इतर भावंडांपासून मी तिथे लोलकासारख्या चकाकत्या, रंगीत काचेच्या गोट्या लपवून ठेवलेल्या… त्या आठवायच्या. आजी… माझ्या रंगीत गोट्यांचा डब्बा?

मी आजीच्या आठवणींच्या गोष्टीचा धागा मुठीत घट्ट पकडून ठेवत, मध्येच विचारायची. फक्त तिलाच माहीत होतं नं माझं गुपित! आहेत गो बायो… ठेवल्यात जपून! तिला हंसू फुटायचं आणि तिच्या दंतविहीन हसण्याचं मला हंसू यायचं. माझ्या केसांवरून हात फिरवत, तिच्या आठवणींची गोष्ट पुढे सरकत राहायची मग. हे असं आठवणी मनाच्या कप्प्यात ठेवायला तिनंच शिकवलं बहुतेक मला. आता बोलताना तिच्या चेहऱ्यावर मध्येच वेदनेची रेष उमटायची. मध्येच ती गप्प होऊन जायची. तिची वेदना माझ्या मनात पाझरायची. आजी, कुठे दुखतंय गं? मी डोळ्यातलं पाणी रोखायचा आटोकाट प्रयत्न करत, तिला विचारत राहायचे. ती कसनुसं हसायची. त्या हसण्याचं मला हंसू नाही यायचं तेव्हा! तिचा सुरकुतलेला हात हातात घेऊन मी नुसतीच तिला थोपटत राहायचे. त्या मावळत्या संध्याकाळी तिच्या वेदनांना पूर आला होता. तरीही मला जवळ घेऊन, ती मला थोपटत बसलेली. हळूच मागे वळून तिनं तिच्या बॅगमधून एक पितळी डबा काढला. तुझ्या आईची भातुकली! तिचे डोळे खट्याळपणे हसत होते. वाव! आई भातुकली खेळायची? मी अधीरपणे तो डबा उघडला. खजिना… लाखमोलाचा खजिना होता त्यात. पितळी चूल, हंडा, कळशी, परात, पोळपाट लाटणं, इवलुसा बंब… माय गॉड! मी सगळ्या गोष्टी समोर मांडल्या आणि विस्फारल्या डोळ्यांनी पाहतच बसले तो खजिना! आई तर पार विसरूनच गेली होती या भातुकलीबद्दल. किती वर्ष जपून ठेवली होती आजीनं ती भातुकली! आज्जू … यू आर ग्रेट! मी तिच्या सुरकुतल्या गालावर ओठ टेकवले तेव्हा तिच्या पापण्या ओलावलेल्या जाणवलं! तू त्या रंगीत गोट्या लपवून ठेवल्या आहेस ना, तसंच तुझ्या आईनं ही भातुकली लपवून ठेवलेली! तुमच्याकडे येण्याआधी गावच्या घरातली माझी खोली लावत होते ना… तेव्हा सापडली! थरथरत्या हातानं तिनं भातुकलीतली कळशी उचलली आणि आपल्या म्हाताऱ्या नजरेनं ती पाहात बसली. परकर पोलक्यातली माझी आई… तिची लेक, तिच्या नजरेसमोर उभी राहिली असेल का? तिनं मांडलेली भातुकली… तो चुरमुऱ्याचा भात आणि लुटुपुटुचा केलेला स्वयंपाक… ते बाहुला – बाहुलीचं लग्न आणि त्यातलं ते वर नाहीतर वधू माय म्हणून मिरवणं…आणि बघता बघता परकर पोलक्यातून साडीत येत, खऱ्याखुऱ्या मुंडावळ्या बांधून, घराचा उंबरठा ओलांडून जाणं… आठवलं असेल का आजीला? त्या मावळत्या सरत्या उन्हात तिचे कुठल्यातरी आठवणीत हरवलेले डोळे, मला अजून आठवतात. अजून तशीच रेशीम ऊन ल्यायलेली, हळवी संध्याकाळ माझ्या मनात उतरते आणि आजी लख्ख आठवते!

माझ्या ओंजळीत किती तरी आठवणींची ठेव ठेवत, आजी निघून गेली… दूरच्या प्रवासाला! बायो… ही भातुकली तर मुलींच्या आयुष्यालाच पुजलेली असते… मरेपर्यंत! पण तू नको बांधून घेऊस तिच्याशी स्वतःला. त्या भांड्यांवर ठोके घातलेत नं… तसे ठोके देत राहत हे आयुष्य! पण ते घातले नं, की भांडं बघ कसं उजळतं! तसं उजळता आलं पाहिजे स्वतःला! जमेल नं तुला? गावाला परत जाताना पोटाशी ओढून घेत ती म्हणाली होती. चौथी – पाचवीपर्यंत शिकलेली माझी आजी…. कुठलं तत्वज्ञान सांगून गेली आयुष्यच? आज हे ठोके खात इथंवर आलेय…. आयुष्य उजळलं की नाही, माहीत नाही. पण तिच्या शब्दांचा प्रकाश तेवतोय मनात… समईच्या मंद ज्योतीसारखा! आजी गं… जमलय नं मला? आठवणींच्या गोतावळ्यात असते तेव्हा मनाची सारी कवाडं उघडतात. मग मी एकटी असूनही एकटी नसतेच मुळी! मला आपलं मानणारी, तरीही मला न भेटलेली, शब्दांतून मला सोबत करणारी माझी माणसं, माझ्या आजीसारखी, माझ्या सोबत असतात आणि जिंदगीचं गाणं त्यांच्या स्वरांत आकंठ भिजत असतं!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -