Saturday, December 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजसुट्टी नव्हे संधी

सुट्टी नव्हे संधी

मृणालिनी कुलकर्णी

“आपण कोणते काम, चांगल्या पद्धतीने करू शकतो हे प्रथम तुम्ही शोधा व त्यानंतर जन्मभर ते मनापासून करा.” – भगवान बुद्ध.

दहावी झाल्यावर नेमकं काय करायचं ते ठरवलं नव्हतं; मुळात काही करायचं असतं हेच ठाऊक नव्हतं. आठवी/नववीच्या एनसीसीत नेमबाजीशी ओळख झाली होती. त्याच सुमारास २००६मध्ये दोन सुवर्णपदक मिळविणाऱ्या तेजस्विनी सावंतविषयी पेपरात खूप वाचले. बाजूच्याच गल्लीत राहणारी तेजस्विनी करू शकते, आपण किमान पाहू तरी, या विचाराने रेंजवर गेले. दोन-तीन महिन्यांसाठी रायफलचे सामान कशाला विकत घ्या म्हणून पिस्तूल प्रकार निवडला. कारकीर्द घडवायला माझ्याकडे पैसे नव्हते. क्रीडा प्रबोधिनी या शासनाच्या उपक्रमात, त्यांचेच साहित्य वर्षभर वापरले. तुम्ही फोकस्ड असाल, तर मार्ग सापडतो. चार लोकांना विचारा, एकजण मदतीला येतो. पिस्तूल नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकाविणाऱ्या राही सरनोबतचा हा अनुभव. ‘सुट्टी नव्हे संधी!’

  • स्वतःला ओळखण्यासाठी कामात बदल.
  • माझ्यात काय सुधारणा करायची म्हणजेच स्वतःच्याच समस्येचे मूळ शोधणे.
  • स्वतःच्या कौशल्याचा कसा उपयोग करून घेता येईल हे पाहा.
  • आपण काय करू शकतो या विचारासाठीसुट्टी सुट्टी नव्हे संधी!’

करिअर ठरलेले असेल तर त्याचे शिक्षण/रियाज/सराव चालू राहतो. आज पदवीनंतर अनेक विद्यार्थी शिक्षण/करिअरसोबत स्वतःचे संगीत, खेळ, समाजकार्य चालू ठेवतात.

स्वशोधासाठी, पुस्तकाबाहेरचे जग पाहण्यासाठी, बाहेर पडाच. सर्वात प्रथम आपल्या पालकाचे कार्यक्षेत्र माहीत हवे. रोजच्या रस्त्यावरून चालताना, प्रवास करताना जे आयुष्य जगत आहात ते मागे टाका, नव्याने आयुष्याकडे पाहण्यासाठी बाहेर पडा.

सकाळी कामासाठी धावणारी ही माणसे/वाहने, कोठे जातात सर्वजण? त्याची जागा शोधा, त्यांच्या क्षेत्राची, कामकाजाची, त्याला लागणाऱ्या शिक्षणाची, प्रवेशाची माहिती घ्या.

नात्यात, परिवारात, ओळखीतून परवानगी घेऊन कोठे भेट देता येत असेल तर उत्तम.

सुट्टीत भेट द्यावी अशी महत्त्वाची स्थळे

शैक्षणिक : विद्यापीठे, संशोधन संस्था, नेहरू सेंटर, आयुका. कला क्षेत्र : चित्र/फोटो प्रदर्शनाच्या गॅलऱ्या, रेसकोर्स, क्रीडांगणे, आकाशवाणी, दूरदर्शन. राजकीय केंद्र : मंत्रालय, मुंबई महानगरपालिका, आर्थिक उलाढाल शेअरबाजार, वृत्तपत्र कार्यालय. फिरण्याची ठिकाणे : गेटवे, नरिमन पॉइंट, प्राणिसंग्रहालय, हवामान खाते, एशियाटिक वाचनालय. ऑफिस भाग – चर्चगेट, बांद्रा येथील बीकेसी परिसर, पासपोर्ट व्हिसाची स्थाने. काही लघू उद्योग व्यवसायिकांना भेटा. ट्रेनमधून फिरा, जेथे जेथे जाल तेथील माहितीपत्रक मागा. एखाद्याच्या शेतात जाऊन काम करा. खेड्यात/गावाला भेट द्या. तेथील लोकांशी बोला, त्यांच्यात मिसळा, त्यांचे लोकजीवन पाहा. सहप्रवाशाचा, दुनियादारीचा, दुर्मीळ माणुसकीचे सारे अनुभव घ्या. कोठेही भेट धावती नसावी. काहीतरी शिकायचं, मिळवायचं, अनुभवायचं या उद्दिष्टाने फिरा. सगळ्यांची नोंद, तपशील ठेवा. युवकांनो, जाण्याआधी नि जाऊन आल्यावरचा होमवर्क हवाच. नेचर/लायन्स क्लब, सामाजिक संस्थांद्वारे-पर्यावरण रक्षण, पाणी वाचवा, स्वच्छता अभियान यात अनेक युवक काम करीत आहेत. निसर्ग जपा. नद्या झाल्या कचरा कुंड्या हे वाचतो नि सोडून देतो. जलपुरुष राजेंद्र सिंहाचे काम पाहा. जंगलातून / अभ्यारण्यातून फिरताना/चालताना सारेच हरवून जातात. त्याला अभ्यासाची जोड देणारे अभ्यासक डॉ. कृष्णमेघ कुंटे, समुद्राशी संबंधित डॉ. सारंग कुलकर्णी, पक्षी तज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचे काम वाचा. फिरण्यातूनच त्यांची कार्यक्षेत्र वाढली. ट्रेकिंगला जाताना गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा जागर करा. बाल/महिला सुधारगृहाला भेट द्या. प्राथमिक खगोलशास्त्राच्या वर्गाला भेट देऊन आकाश दर्शन पाहा. थोडक्यात स्वतःच्या आवडीप्रमाणे, स्वतःला समृद्ध करा, विकसित करा. ‘हे करायचे राहून गेले’ असे वाटू नये.

बालपणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानातून मिळालेल्या संस्कारातून इतिहास जाणून घ्यायची, डोंगर-दऱ्याची आवड निर्माण झाली. पद्धतशीर हायकिंगचे ट्रेनिंग घेतले ते प्रणित शेळके. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातले प्रणित शेळके यांनी पहिले आंतरराष्ट्रीय शिखर ‘माऊंट किल्ली मांजरी’ सर केले.

सुट्टीत तरुणांसांठी काही कार्यालये कार्यशाळा भरवतात. संदीप वासलेकरांच्या लेखातून रावसाहेब शिंदे यांनी श्रीरामपुरात टाटा समूहाच्या वतीने कॉल सेंटर सुरू केले. कॉल सेंटरमध्ये आदिवासी, शेतकरी कुटुंबातील मुलांना महिना चार हजार रुपये देत होते. पैशापेक्षा ते आत्मविश्वास घेऊन बाहेर पडतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अडीच लाख मुलांना संगणक शिकविले. काही वर्षांपूर्वी रयत संस्थेने भाभा येथील शास्त्रज्ञांच्या मदतीने शास्त्रीय प्रयोग १५ वर्षांच्या पंधरा हजार मुलांना मार्गदर्शन केले. युवकांनो उन्हाळी सुट्टीत तुम्हीही काही ठिकाणी स्वतः सहभागी होऊन, तुमचा अभ्यास किंवा कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य देऊ शकता. रोज तीन-चार वर्तमानपत्र वाचा.

घरी राहूनही संगणकद्वारे परदेशी भाषा शिका. शॉर्ट्स फिल्म्स, आवडत्या व्यक्तीची भाषणे, मुलाखती ऐका. सारे उपलब्ध आहे. संगणक, मोबाइलशिवाय लहान मुलांसोबत निवांत बोला. बोलतं करण्यासाठी त्याचबरोबर त्यांची समरणशक्ती/निरीक्षणशक्ती तीव्र करण्यासाठी मजेदार खेळ खेळा.

  1. राजीव तांबेचा ‘खुर्च्यांच्या भेंड्या’ लेखाप्रमाणे, तुम्ही पाहिलेल्या खुर्च्यांची नावे सांगा – संगणकापुढची पाच चाकांची खुर्ची, थिएटरमधील खुर्ची, आजारी लोकांची व्हीलचेअर, दिव्यांगाची तीनचाकांची, डेंटिस्टची, ट्रेनमधील एसी चेअर, अशा अनेक खुर्च्यांची नावे मुलांनी सांगितली.
  2. रेणू दांडेकरांनी एकदा वीज गेली असताना मुलांशी बोलताना घरातील विद्युत उपकरणाला पर्यायी मराठी शब्द सांगा, हा खेळ घेतला.
  3. अनेक वस्तू असलेले चित्र दोन मिनिटे पाहून नंतर आठवून त्या चित्रातील वस्तू लिहा.

असो. शेवटी लक्षात ठेवा, “आज तुम्ही वेळ फुकट घालविल्यास तीच वेळ तुमचे आयुष्य कुरतडेल.” सुट्टीचा उपयोग करा. ‘सुट्टी नव्हे संधी.’

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -