रत्नागिरी (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीतील गाळ काढण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी पोकलेन दिला आहे. त्यामुळे गाळ काढणे आता सुलभ होणार आहे.
राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीमध्ये साचलेल्या गाळामुळे पुराची समस्या वाढली असून गतवर्षी आलेल्या महापुराचा फटका रायपाटणसह लगतच्या गावांना बसला होता. त्यामुळे अर्जुना नदीतील गाळ उपसा करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्याकडे केली होती. राणे यांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन रायपाटण येथे अर्जुना नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेत ग्रामस्थांना एक पोकलेन तत्काळ उपलब्ध करून दिला.
राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीतील गाळाचा प्रश्न ऐरणीवर आला असून गत वर्षी या साचलेल्या गाळामुळे अर्जुना नदीला अनेक वेळा पूर आला. त्यामुळे तीन बळी गेले. त्यामुळे रायपाटण येथील ग्रामस्थांनी राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. सरपंच महेंद्र गांगण यांनी निवेदनात म्हटले होते की, या गाळ उपशाबाबत आपण याकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधूनही गाळ उपशाबाबत कार्यवाहीबाबत चालढकल केली जात आहे. निवेदनाची राणे यांनी त्वरित दखल घेऊन पोकलेनची व्यवस्था केली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
पोकलेनद्वारे गाळ उपसण्याचा प्रारंभ आज झाला. त्यावेळी ग्रामस्थ तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, समीर खानविलकर, सरपंच महेंद्र गांगण, मनोज गांगण, भास्कर गांगण आदी उपस्थित होते.