Tuesday, April 22, 2025
Homeकोकणरायगडपाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार

पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार

रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरमुळे रुग्णाचे हाल

सुधागड-पाली (वार्ताहर) : पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी रात्री ऑक्सिजन कमी झालेल्या तरुण रुग्णाला उपचारासाठी दाखल केले होते. मात्र या ठिकाणी असलेले ऑक्सिजनचे सिलिंडर रिकामे असल्याने त्या रुग्णाची फरपट झाली. अखेर खासगी दवाखान्यातून ऑक्सिजन सिलिंडर आणून त्या तरुणाला रुग्णवाहिकेतून कळंबोली येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गौरव ओसवाल हा तरुण पाली पोलीस स्टेशनमध्ये कारागृहात होता. यावेळी त्याला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्या ऑक्सिजनची पातळी खाली गेल्यामुळे पोलिसांनी त्याला पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले सहा ऑक्सिजनचे सिलिंडर चक्क रिकामे होते. ऑक्सिजनअभावी या रुग्णास त्रास होत होता. त्यानंतर काही वेळाने येथील डॉक्टर नितीन दोशी यांच्या रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर आणून रुग्णाला लावण्यात आला आणि रुग्णवाहिकेतून त्याला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. यावेळी रुग्णासोबत डॉ. उमाकांत जाधव उपस्थित होते.

या दरम्यानच्या काळात रुग्णाचे नातेवाईक व नागरिक पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात जमा झाले होते. कोविड काळात अनेक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर, औषधे व इतर साधनसामग्री दिली होती. मात्र या सर्व साधनसामग्रीचा योग्य प्रकारे वापर व देखभाल होत नसल्याचे सांगून नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे व इतर पोलीस उपस्थित होते.

या घटनेची दखल घेतली असून पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. रिकामे ऑक्सिजन सिलिंडर तत्काळ भरून रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात येतील. पुन्हा अशी घटना घडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. शिकांत मढवी, सुधागड तालुका आरोग्य अधिकारी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -