मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच मुंबई महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केली असून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता होणारी महापालिका निवडणूक २३६ प्रभागांवर होणार हे स्पष्ट झाले आहे.
सन २०१७ मध्ये झालेली मुंबई महापालिकेची निवडणूक ही २२७ प्रभागानुसार झाली होती. मात्र यावर्षीच्या निवडणुकीसाठी मुंबईत प्रभाग रचना वाढवण्यात आली आहे. मुंबईत वाढलेल्या लोकसंख्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईतील ९ प्रभाग वाढवले होते. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आता पहिल्यांदाच ओबीसी आरक्षणा शिवाय ही निवडणूक होणार आहे. तर ओबीसी शिवाय कशा पद्धतीने प्रभागांची रचना केली जाणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहेत.
मुंबई महापालिका क्षेत्र जितक्या विभाग रचनेत व्यापता येणार आहे त्यानुसार विचार करून प्रभाग ठरवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे आता राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.