डॉ. वीणा सानेकर
आटपाट नगर होतं. लोक सुखाने जगत होते. धन, धान्य आबादी आबाद सगळे कसे संपन्न आणि समृद्ध होते. राजाने प्रधानजींना राज्याची हालहवाल विचारायला सुरुवात केली.
राजा : प्रधानजी राज्याची हालहवाल कशी काय आहे?
प्रधान : महाराज ऑल वेल आहे.
राजा : राज्याची जनता कशी काय आहे?
प्रधान : एकदम फँटॅस्टिक आहे.
राजा : शेती, उद्योग, कारखाने…?
प्रधान : सर्वत्र ग्रोथच ग्रोथ आहे.
राजा : अहो प्रधानजी, तुम्ही प्रत्येक वाक्यात इंग्रजी कशाला पेरत बसलाय?
प्रधान : अहो राजे, आता आपल्या राज्याची भाषा अशीच आहे.
राजा : अरे ही काय भाषा आहे? ही तर भेसळ आहे. नाही, नाही. मिसळ आहे.
प्रधान : नाही महाराज. ही मिंग्लिश आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिक्स केल्याशिवाय आजकाल कुणीच बोलत नाही आपल्या राज्यात.
राजा : काय चाललंय काय हे, आपल्या मायभाषेचे काय होणार अशा परिस्थितीत?
प्रधान : महाराज, उगाच चिंता करू नका. आपल्या मायमराठीचा इतिहास वैभवशाली आहे. आपली मराठी अजरामर आहे. आचंद्रसूर्य तिला मरण नाही, असे आपल्या राज्याचे साहित्यिक म्हणतात.
राजा : नुसतं बोलून काय होणार? ताबडतोब नवरत्नांचा दरबार भरवा. आपल्या भाषेचा प्रश्न आहे हा.
प्रधान : राजे, अहो हा प्रश्न कोण गंभीरपणे घेणार? महाराज, प्रश्न पाण्याचा असतो, हवेचा, विजेचा असतो. रोजगाराचा असतो. गरिबीचा असतो. भाषेचा प्रश्न?
राजा : प्रधानजी, ते काही नाही. नवरत्नांना याबद्दल काय वाटतं हे पाहायलाच हवं.
महाराजांनी नवरत्नांचा दरबार भरवला. प्रधानजींनी म्हणे दणदणीत बुफेची ऑर्डर दिली. नवरत्नांचे मेंदू मग जोरात चालू लागले. मुळात त्यांना भाषेचा प्रश्न असू शकतो, हे पटेना. त्यांच्या मते भाषेकरता राज्यात विविध यंत्रणा अस्तित्वात होत्या. ‘साम्राज्य मराठी विकास संस्था’, ‘मराठी जगत कोश’ भाषा संचलन ‘आलय’ या यंत्रणा मराठीकरता काम करत असल्याचे नवरत्नांनी एकमताने सांगितले. महाराजांनी या सर्व संस्था नि यंत्रणांच्या पदावरील सर्वांचा दरबार भरवण्याची आज्ञा फर्मावली. सर्वांनी विस्तृत अहवाल सादर केले. महाराजांवर आपल्या अंतर्गत झालेल्या कामांचा असा काही भडिमार केला की महाराज भांबावून गेले. भाषेचा प्रश्न सर्वांनी निकाली काढला. प्रधानजी म्हणतात त्यानुसार भाषेचा प्रश्न अस्तित्वात नसल्याचा साक्षात्कार महाराजांनाही झाला. पण भाषेकरिता काहीतरी करत आहोत, असा गाजावाजा महाराजांना करायचाच होता. महाराजांनी नवरत्नांना कामाला जुंपले. संशोधन करायला सांगितले. त्याकरता त्यांच्या समितीला सातासमुद्रापार पाठवले.
मग विदेश दौरा करून आल्यावर तिथे पाहिलेली एक संकल्पना समितीने राजांना सुचवली. महाराजही मग सातासमुद्रापलीकडे जाऊन आले. तिथे अत्यंत नावीन्यपूर्ण असे पुस्तकांचे गाव महाराजांना दिसले. ते पाहून महाराज प्रभावित झाले. त्यांनी तसेच गाव आपल्या राज्यात वसवायचे ठरवले. हे गाव म्हणजे पर्यटन केंद्रच करायचे, असे त्यांना सुचले. त्यांनी तसे आदेशही दिले. त्याकरिता एका गावाची निवड झाली. प्रधानजींच्या मते हा पायलट प्रोजेक्ट होता. महाराज सतत पाठपुरावा करत होते. वेध घेत होते. पुस्तकं सजली होती. लोकांनी पुस्तकांच्या गावाला सहली काढायला सुरुवात केली. मुले-बाळे तिथे पुस्तकांसोबत सेल्फी काढण्यात रमू लागली. महाराज स्वत:वर खूश झाले. पुस्तकांची आणखी गावे वसवतो, म्हणाले. गावांची निवड झाली.
महाराज कल्पना विलासात रमू लागले. दिवसाही त्यांना स्वप्ने पडू लागली. लोक पुस्तकांच्या गावांना भेटी देतायत. पुस्तकांवर प्रेम करतायत. वाचनसंस्कृती वाढते आहे. पुस्तकांच्या गावात खास करून घेतलेली पुस्तकांची कपाटे. ओळीने लावलेली पुस्तके. महाराज स्वत:शीच म्हणाले, ‘किती देखणी दिसतायत पुस्तकांची गावे! खरोखर मायभाषा मराठीला आचंद्रसूर्य मरण नाही.’
एकदा पहाटेच अशा मायमराठीच्या रम्य स्वप्नात राजे गुंग होते. इतक्यात एक वासुदेव राजवाड्यासमोर गाऊ लागला. ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दरीखोऱ्यातील शिळा…’
वासुदेव गात-गात मराठीच्या संवर्धनाचा संदेश देत होता.
‘राजे हो, शहरातल्या मराठी शाळा बंद पडतायत. गावोगावी इंग्रजी शाळा फोफावतायत. आधी मराठी पुस्तकांचा वाचक घडवला पाहिजे. पुस्तकांची गावे उभी करून जगेल का मायमराठी? त्यापेक्षा गावोगावी पुस्तके नेली पाहिजेत.’
‘भाषा म्हणजे शोभेची वस्तू नव्हे. ती ओतप्रोत जगण्याची गोष्ट आहे.’ राजा अंतर्मुख झाला. वासुदेव गातच होता…
‘माझ्या मराठीचा दिवा
घरोघरी तुम्ही लावा
तिच्या लख्ख प्रकाशात
महाराष्ट्र उजळावा.’