Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाजखराट्याची खरखर

खराट्याची खरखर

डॉ. पल्लवी परुळेकर – बनसोडे

धुळीचा कण माखवी
त्याचे सारे अंग
कुबड्या हातात खराटा
करी खरखर…

उन वाढतच होतं. कमालीचा उकाडा… सूर्य तप्त आग ओकत होता. हवाही मंदावलेली… मरगळ मरगळ नुसती… भर दुपारी बाराची वेळ. चारही बाजूला समुद्र खाडी त्यामुळे दमट वातावरण जणू काही आंदण म्हणूनच मिळालेले. नकोसं करून टाकणारा घाम आणि वेळेवर पोहोचण्याची घाई, नुसती तारेवरची कसरत. त्यात नायगाववरून जायचे म्हणजे वसई कोर्टावरून निघा, पापडी नाक्यावर दुसरी रिक्षा करा. ती भरेपर्यंत नाकेनऊ…

कसेबसे नायगाव स्टेशनला पोहोचले. तिकीट काऊंटरवर पुन्हा रांग… कंटाळवाणं सारं… इंडिकेटर पाहिलं. नायगावला उशिरा येणारी नेहमीची १२.४७ची बान्द्रा लोकल. मधला डबा आणि बेताचीच मिळणारी चौथी सीट. रखडत रखडत उन्हाचा ताप तिलाही सोसवत नसावा म्हणून मध्येच धापा टाकत चालू असते. स्लो ट्रेन या शब्दाचा अर्थ सार्थकी लागावा म्हणून हळुवार कासवाच्या गतीने धावणारी ही ट्रेन कंटाळा आणते. आधीच घामाच्या धारा, त्यात गर्दी, तो घामेजलेला स्पर्श, तो वास, सारं काही सोसण्यापलीकडे पण पर्यायच नाही ना. वेस्टर्न रेल्वेला जणू हा शापच आहे गर्दीचा… श्वास कोंडून जगण्याचा… लोकवस्ती वाढली, स्थित्यंतरं झाली, बदल झाले, लोकसंख्या वाढली, पण कोंबून नेणाऱ्या ट्रेनची संख्या मात्र जैसे थै… आपल्याला पर्यायच नाही असाच प्रवास करण्यापलीकडे. मग करा प्रवास, उकाड्यातला…

पण त्या दिवशी या गर्दीतल्या चिवचिवाटातही ऐकू आली ती खराट्याची खरखर… आणि नजर वळली त्या कुबड्या शरीराकडे… एक हात, एक पाय नसलेला, कमरेची कमान करून सीटखालील कचरा सारून भिकेची याचना करणारा तो नखशिखान्त धुळीत माखलेला, फाटक्या कपड्यानेही त्याची संगत सुटू नये म्हणून चिपकून त्याला मिठी मारावी असा ‘तो’ निःशब्द करून गेला. अर्ध्या शरीराची मालकी असणारा तो आणि त्याला जगवणारा तो खराटा. खरखरत का होईना त्याची एक वेळची भाकरीच होता. फारशी कारुण्यता त्याच्याविषयी कुणी व्यक्त करत नव्हतं. कारण त्याचं कळकटलेलं शरीर पांढरपेशा कपड्यांना स्पर्शू नये म्हणून जो तो जपत होता. माणसातलं माणूसपण संपत चालल्याचा हा अनुभव… माझ्यासाठी दाहकच… वीतभर कपड्याचीही मालकी नव्हती त्याची.

आपण मात्र दिवसागणिक किती कपड्यांची बोचकी बांधतो त्याचा हिशोबच नाही… बोवारणीला बोलावून जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी घेतो. संसार काही सुटत नाही. जरा कुठे फाटलं की रफू करण्याऐवजी सरळ बाजूला टाकतो तो कपडा, थोडा कुठे रंग उडाला, शॉर्ट झाला कपडा की तो जुन्याच्या पंगतीत Replacement च्या यादीत जमा होतो. इथे मात्र एक पाय आणि एका हातावर बॅलेन्स करणारं शरीर… डोकं सुन्न करत होतं. आपण जगण्यासाठी किती विषयाचे धागे गुंफत असतो. किती वस्त्रागणिक आयुष्य बदलत जातं. मन आणि बुद्धीला विचार करायला लावणारं हे अस्तित्व आणि खरंच ती खरखर माझ्यापर्यंत पोहोचते न पोहोचते तोच त्याचा तो एक हात खराटा उलट्या बाजूस फिरवून करुणेने पाहत होता…

मी मात्र सुन्न होते कुबड्या विचारांनिशी…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -