Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजरावसाहेब दानवेंकडून कोकणवासीयांच्या अपेक्षा……

रावसाहेब दानवेंकडून कोकणवासीयांच्या अपेक्षा……

सतीश पाटणकर

कोकणची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकण रेल्वे प्रकल्पाने गेली सुमारे २३ वर्षे यशस्वी वाटचाल केली. प्रा. मधु दंडवते रेल्वे मंत्री झाले आणि कोकणात रेल्वे आली. सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले. प्रभू यांनी कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित व जलदगतीने व्हावा यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून ५ नवीन क्रॉसिंग स्टेशन उभारण्याचे काम हाती घेतले असून यापैकी तीन रेल्वे स्टेशन हे रायगड जिल्ह्यात आहेत. त्यापैकी एक माणगांव तालुक्यातील इंदापूर येथे आहे. सुरेश प्रभू यांनी केंद्रात कोकणी माणसाचा प्रवास आरामदायक बनवण्यासाठी तसेच पर्यटनासाठी अधिकाधिक रेल्वे सुरक्षा देण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, विद्युतीकरण व ११ नवीन स्थानकांच्या बांधकामांचा निर्णय आपल्या रेल्वे मंत्रीपदाच्या कारकिर्दीत घेतला होता. प्रभू यांच्यामुळे कोकण रेल्वेचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली.

रेल्वे मंत्रालयावर गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतीय मंत्र्यांचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे राज्याला रेल्वे अर्थसंकल्पात फारसे काही आले नाही. अशी ओरड नेहमीच केली गेली. आता मात्र महाराष्ट्रातून रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्याने जनतेच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्या पाठीवर असणार आहे. विक्रमी वेळेत पूर्ण झालेला कोकण रेल्वे प्रकल्प प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच अतिशय लोकप्रिय असून, गेल्या तीन वर्षांत या मार्गावरील माल वाहतूकही वाढल्यामुळे प्रकल्प किफायतशीर होऊ लागला आहे. मात्र प्रकल्पासाठी स्वतंत्र कोकण रेल्वे महामंडळ असल्यामुळे रेल्वे खात्याकडून विस्तार योजनांबाबत दुर्लक्ष करण्याचेच धोरण अवलंबण्यात आले आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरातपासून कर्नाटक ते केरळपर्यंत विविध लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या या मार्गावरून धावतात. त्यांची संख्या सातत्याने वाढती असल्यामुळे प. महाराष्ट्रातून कोकणात येण्यासाठी कराड ते कोल्हापूर या पट्ट्यातून घाट रस्ते आहेत.

त्याबरोबरीने कराड ते चिपळूण, कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-सावंतवाडी या मार्गांनी कोकण रेल्वेला जोडण्यासाठी सर्वेक्षणाचे प्रस्ताव वेळोवेळी झाले आहेत. पण त्यापुढे हे विषय सरकलेले नाहीत. यापैकी कोणताही एक मार्ग झाला तरी कोकण प. महाराष्ट्राशी जोडले जाऊन माल वाहतुकीसाठी फायदेशीर होईल. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील वापरात असलेली बंदरे कोकण रेल्वे मार्गाशी जोडली गेल्यासही रस्ता वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

या मार्गावरून लांबपल्ल्याच्या आणि वेगवान गाड्या मोठ्या संख्येने धावत असल्या, तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणवासीयांना मर्यादित थांब्यांमुळे त्यांचा उपयोग होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्स्प्रेसच्या धर्तीवर गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी स्थानिक प्रवासी संघटनांकडून होत आहे. याशिवाय कोकणातील बंदरांना रेल्वेमार्गाने जोडण्याचे धोरण रेल्वे मंत्रालयाने अवलंबिले आहे. या अंतर्गत जयगड आणि दिघी बंदरांना रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे. जयगड बंदरातील प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र दिघी बंदर ते माणगाव दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही. अलिबागला रेल्वेमार्गाने जोडण्याची मागणी आहे.

यासाठी पेण ते अलिबाग दरम्यान २८ किलोमीटर लांबीची रेल्वेलाइन टाकली जाणार आहे. या २८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून यासाठी जवळपास ३४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीए आणि रेल्वे बोर्डाचा संयुक्त प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची उभारणी करण्याचा प्रस्ताव आहे. एमएमआरडीएने देखील या रेल्वेमार्गासाठी निधी देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.

मुंबई ते सावंतवाडी दरम्यान विशेष जलद गाड्या असाव्यात आणि या गाड्यांना कोकणात जादा थांबे असावेत, अशीही मागणी वेळोवेळी केली जात आहे. मंगला एक्स्प्रेस आणि मंगलोर एक्स्प्रेसला सावंतवाडीत थांबा देण्याचे रेल्वे मंत्रालयाने मान्य करूनही अद्याप या २ गाड्यांना थांबा मिळालेला नाही. मोठा गाजावाजा करून सावंतवाडी टर्मिनसचे काम पुढे सरकलेले नाही. या मार्गावर सावंतवाडी वसई एक्स्प्रेस रात्री सोडावी ही प्रवासी संघटनेची खूप जुनी मागणी आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कोकणच्या लोकांची ही मागणी पूर्ण करतील, अशी कोकणवासीयांना खात्री आहे.

मुकुंदराव किर्लोस्कर यांनी ‘कोकण रेल्वे हा रेल्वेच्या इतिहासातील एक चमत्कार आहे’ असे प्रतिपादन केले आहे. हा एक चमत्कारच आहे, याचे कारण प. किनाऱ्याला समांतर रेल्वेमार्ग बांधणे हे त्या प्रदेशातील उंच-सखलपणा आणि खाड्यांमुळे जििकरीचे काम होते. सुमारे १० टक्के मार्ग बोगद्यातून जातो. सर्वात मोठा साडेसहा कि. मी. लांबीचा बोगदा रत्नागिरी-संगमेश्वर रेल्वेमार्गावर ‘करबुडे’ येथे आहे, तर सर्वात उंच ६५ मीटर उंचीचा पूल रत्नागिरीजवळ ‘पानवल’ येथे आहे. रेल्वेचे स्वप्न साकार झाले खरे, पण कोकण रेल्वेचा खरा लाभ आज गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्याला मिळत आहे. कोकण कन्येबरोबरच इतर गाड्यांचे डबे वाढवणे गरजेचे आहे. जादा गाड्यांचे रिझर्वेशन तीन मिनिटांत संपुष्टात कसे येते हा संशोधनाचा विषय आहे. कोकणातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर नागरी सुविधा वाढविणे, तसेच दिल्ली आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना कोकणातील महत्त्वाच्या स्थानकावर थांबे देणे आवश्यक आहे.

जगात चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क असलेल्या कोकण रेल्वे सेवेची सुरुवात २६ जानेवारी १९९८ रोजी झाली. कोकणचे खासदार दिवंगत नामदार मधु दंडवते यांच्या पाठपुराव्याने सुरू झालेल्या कोकण रेल्वेचे मुख्यालय नवी मुंबई येथे असून संपूर्ण कारभारदेखील महाराष्ट्रातून हाकला जातो. तुलनेने सर्वाधिक नफ्यात असलेल्या कोकण रेल्वेसाठी कोकणवासीयांच्या बहुतांश जमिनी उपयोजित झालेल्या असूनही सद्यस्थितीत कोकण रेल्वेचा लाभ कोकणवासीयांपेक्षा परराज्यातील नागरिक अधिक प्रमाणात घेत आहेत. मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्यातील समन्वयाचा अभाव हा नेहमीच वादातीत मुद्दा राहिला आहे. पनवेल ते रोहा दरम्यान मध्य रेल्वे आणि त्यानंतर कोकण रेल्वे कार्यरत आहे. मात्र दोन्ही रेल्वे विभागात समन्वय आणि ताळमेळ नसल्याचे दिसून आले आहे. नागोठणे येथील रेल्वे अपघात असो अथवा रोहा येथील मोटरमनने गाडी पुढे नेण्यास दिलेला नकार असो, यावरून दोघांमधील वाद नेहमीच चव्हाट्यावर आले आहेत. याता हे वाद मिटवण्यासाठी रेल्वेमंत्री काही पावले उचलणार का? याबाबतही काही निर्णय होणार का? याकडेही कोकणवासीयांचे लक्ष असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -