Tuesday, April 29, 2025

क्रीडा

राजस्थानसाठी ‘करो या मरो’

राजस्थानसाठी ‘करो या मरो’

मुंबई (प्रतिनिधी) : लखनऊ सुपर जायंट्सने विजय मिळवल्यास आयपीएल २०२२च्या प्लेऑफमधील त्यांचे स्थान निश्चित होईल. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने विजयाची नोंद केल्यास अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकेल. विजयामुळे लखनऊचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल, तर एक पराभव राजस्थान रॉयल्ससाठी प्ले-ऑफचा मार्ग कठीण करेल. त्यामुळे लखनऊ आणि राजस्थान यांच्यात रविवारी होणारा सामना राजस्थानसाठी ‘करो या मरो’ असाच आहे. कारण पराभव झाल्यास त्यांना इतरांच्या जय-पराजयावर आणि रनरेटवर अवलंबून राहावे लागेल.

सलग चार विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील सुपर जायंट्स संघाने गुजरात टायटन्सविरुद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात त्यांचे पहिले स्थान गमावले होते. सुपर जायंट्स १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत आणि प्लेऑफ सुरू होण्यापूर्वी त्यांना दुसरा सामना गमावायचा नाही. मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आठ गडी राखून पराभूत झाल्यानंतर रॉयल्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याचा त्यांचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. सुपर जायंट्सच्या संघाने राजस्थानविरुद्ध विजय नोंदवला, तर त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सच्या संघाने विजयाची नोंद केल्यास अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले जाईल.

लखनऊ संघासाठी कर्णधार राहुल आणि क्विंटन डी कॉक यांना पुन्हा एकदा फलंदाजीची जाबाबदारी घ्यावी लागेल. टायटन्सविरुद्ध हे दोघेही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे त्यांना रॉयल्सविरुद्ध चांगली खेळी करावी लागेल. हुडा देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत तीन अर्धशतकांच्या मदतीने ३४७ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, रॉयल्स संघाची भिस्त पुन्हा एकदा फलंदाज जोस बटलरवर असेल, ज्याने १२ सामन्यांत ३ शतके आणि ३ अर्धशतकांच्या जोरावर तब्बल ६२५ धावा केल्या आहेत.

त्याचे सहकारी मात्र चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत. कर्णधार संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला असला तरी त्याची कामगिरीही तितकीशी वाईट झालेली नाही. दिनेश कार्तिकही चांगला फिनिशर आहे. रॉयल्ससाठी देवदत्त पडिक्कलने गेल्या दोन सामन्यांत ३१ आणि ४८ धावा करून कामगिरीत सातत्य दाखवले असले तरी संघ अजूनही त्याच्याकडून मोठ्या खेळीची वाट पाहत आहे. शिमरॉन हेटमायरनेही पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मागील सामन्यात गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा रॉयल्सचा सर्वाधिक धावा करणारा होता आणि संघ फलंदाज म्हणून त्याच्या क्षमतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.

ठिकाण : ब्रेबॉर्न स्टेडियम वेळ : रात्री ७.३० वाजता

Comments
Add Comment