Tuesday, July 1, 2025

ऑल राऊंडर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

ऑल राऊंडर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ एलिस रिव्हर ब्रिज येथे हा अपघात झाला. या अपघातात अँड्र्यू सायमंड्सला गंभीर दुखापत झाली होती. शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.


टाऊन्सविलेच्या पश्चिमेला ५० किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये रात्री १०.३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाला होता तेव्हा अँड्र्यू सायमंड्स एकटाच गाडीत होता, असे क्वीन्सलँड पोलिसांनी सांगितले.


ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे कार अपघातामध्ये निधन झाल्यानंतर संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का बसला आहे. त्याच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात असून क्रिकेट जगतातील दिग्गजांनी या वृत्तानंतर दु:ख व्यक्त केले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरनेही ट्विटरद्वारे जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.


https://twitter.com/sachin_rt/status/1525697460294758400

सायमंड्सने आपल्या कारकिर्दीत एकूण २६ कसोटी, १९८ एकदिवसीय आणि १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. २००३ आणि २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत सायमंड्सचे महत्त्वाचे योगदान होते. काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. आणि आता अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment