Saturday, July 20, 2024
Homeकोकणरायगडमाथेरान शटल सेवेसाठी लवकरच अतिरिक्त प्रवासी डबे

माथेरान शटल सेवेसाठी लवकरच अतिरिक्त प्रवासी डबे

आठ डब्यांच्या चाचणीची तयारी

नेरळ (वार्ताहर) : माथेरानच्या थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची माथेरान ते दस्तुरी नाका या मिनीट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा असते. त्यासाठी मिनीट्रेनच्या शटल सेवेच्या गाड्यांना अतिरिक्त प्रवासी डबे जोडण्याची मागणी करणारे निवेदन माथेरानकरांनी केले होते. दरम्यान, मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक शलभ गोएल यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शटल सेवेसाठी लवकरच अतिरिक्त डबे मिळणार आहेत.

माथेरानचे पर्यटन हे मिनी ट्रेनवर अवलंबून आहे. डब्यांची संख्या कमी असल्यामुळे शटलसेवेचा लाभ घेता येत नाही. त्याकरिता शटलसेवा ही आठ डब्यांची करावी तसेच शनिवार, रविवारप्रमाणे सोमवार ते शुक्रवार शटल सेवेच्या कमीतकमी दहा अप आणि दहा डाऊन अशा सेवा चालू करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावेत जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांची सोय होऊन रेल्वेच्या उत्पन्नात भर होणार आहे. नेरळ-माथेरान सिमेंटचे स्लीपर टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच ऑप्टिकल केबलचेही काम अंतिम टप्यात असून ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात नेरळ-माथेरान सेवा अखंडितपणे, जास्त फेऱ्या सुरू करण्याचे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच राज्य सरकार आणि नगर परिषद यांच्या सहकार्याने रेल महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्याचा आणि विविध उपक्रम राबविण्याचा मानस गोएल यांनी बोलून दाखविला.

माथेरानचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, माजी नगरसेवक प्रसाद सावंत, कुलदीप जाधव यांनी मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक शलभ गोएल यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी प्रेरणा सावंत यांचे निवेदन गोएल यांना देण्यात आले. यावेळी शटल सेवेच्या गाड्यांना अतिरिक्त प्रवासी डबे जोडण्याबाबत निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

गोएल यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन १६ मे ते २० मे दरम्यान शनिवार रविवारप्रमाणे दहा फेऱ्या सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच मॅकेनिकल विभागाकडून आठ डब्यांची चाचणी घेऊन त्याचीही पूर्तता करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासित केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -