Categories: कोलाज

व्यसनमुक्ती

Share

प्रियानी पाटील

व्यसनमुक्तीचे धडे देण्यात आजवर निमिषाने एक पाऊलदेखील मागे हटवलेले नाही. कॉलेज असो किंवा एखादा व्याख्यानाचा कार्यक्रम तिने व्यसनमुक्तीसाठी जीव तोडला. समाजातील ही परिस्थिती सुधारण्यासाठी अनेकींचे संसार मार्गी लागावेत म्हणून ती झटली. दारू पिणाऱ्या माणसाला समजावण्यापेक्षा त्याच्या पत्नीला समजावून संसार वाचवण्याचा तिचा कल साध्यही झाला. विडी, सिगारेट, तंबाखूची व्यसनं किती घातक असतात शरीरासाठी याचं महत्त्व पटवून देताना ती मागे सरली नाही. उलट आपल्या साथीने अनेक मैत्रिणींना आपल्या बरोबरीने उभं केलं. अनेक संसार हसते खेळते केले. पण हे झालं बाहेरच्या जगाचं, आपल्या घराचं काय?

निमिषाने जेव्हा आपल्या घरातील परिस्थिती सुधारण्याचा चंग बांधला तेव्हा तिला कोणताही रिझल्ट दिसून आला नाही. घरात सासुबाई पान सुपारी, कात, चुना टाकून तासनतास विडा तोंडात घेऊन घोळवत बसणारी. सासरे सिगारेटचे झुरके मारत आराम खुर्चीत निवांत, तर नवरा अधून मधून पार्टी करून व्यसनाच्या आहारी गेलेला आणि निमिषाचा मुलगा तो दहा-बारा वर्षांचा त्याच्यावर असले काही भलते-सलते परिणाम व्हायला नकोत म्हणून ती त्याला या साऱ्यांपासून दूर ठेवत आलेली. पण ओढ आजी-आजोबांची मुलाला दूर ठेवू शकली नाही आणि बाहेर व्यसनमुक्तीचे धडे देणाऱ्या निमिषाला काही घरातील व्यसनमुक्ती करता आलेली नाही. याचं दु:ख तिला फार सलत राहिलेलं.

एकदा सासूने पानाचा विडा बनवताना तो नकळत नातवाजवळ सरकवला. पान खाऊन लाल होणारं तोंड याचं आकर्षण मुलालाही होतंच. मुलाने विडा सरळ आपल्या तोंडात सरकवला आणि निमिषाला घाबरून आजीच्या मागे लपला.

काय करावं या माणसांना, स्वत: तर सुधारत नाहीत आणि आता लहान मुलालाही व्यसनाच्या आहारी नेणार आहेत. मुलाने पान खाऊन तोंड लालेलाल करून टाकलं आणि पान चघळत बसला. आजोबांच्या शेजारी जाऊन त्यांना विडी देणं, ती पेटवून आणणं हे देखील आजोबा त्या लहानग्याकडून करून घ्यायचे. निमिषाचं काळीज आता चर्रर्र झालेलं. मुलगा विडी पेटवायला गेला, तर त्याला चटका तर लागणार नाही ना, या भीतीपेक्षा मुलाने विडी पेटवल्यानंतर ती तोंडात धरून त्याचे झुरके तर मारणार नाही ना, ही भीती तिला जास्त वाटली. ती म्हणाली सासऱ्यांना, तुम्ही त्याला नादाला लावू नका. अशाने माझा मुलगा पुढे व्यसनी होईल. शाळा ऑनलाइन झाल्यापासून मुलगा अगदी वाया गेला घरात राहून. मोबाइलवर अभ्यास करता करता, आजी-आजोबांच्या शेजारी बसून बसून व्यसनाच्या दिशेने त्याचं पाऊल पडू लागल्याचं तिने जाणलं. पान काय खातो, हळूच आजोबांची विडी पिण्याची नक्कल काय करतो, आजीसारखा तंबाखू मळण्याची अॅक्शन करून तो तोंडात सारण्याची अॅक्टिंग काय करतो, याचं कौतुक जेव्हा आजी-आजोबा पाहुण्यांसमोर गायला लागले तेव्हा निमिषा मनातून घाबरली. आपला मुलगा नुसता अॅक्टिंग करतोय की, या साऱ्या गोष्टींची चवही घेतोय. तिला वाटलं हे सासू-सासरे आपल्यावर मागील जन्माचा सूड उगवताहेत. पान, तंबाखू, विडी, पार्ट्या करणं सोडा, असं अनेकदा सांगूनही ना सासू ऐकली, ना सासरा, ना नवरा आणि आता मुलगाही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकणार असं तिला वाटून गेलं नकळत. काय करावं याचं. तिने ठरवलं, आपण बाहेर जी व्याख्यानं देतो, तसं एखादं व्याख्यान घरातच आयोजित केलं तर, तसंच करू म्हणून तिने सासू, सासरा आणि नवऱ्यासमोर हे सांगून पाहिलं, पण कोणी दाद दिली नाही. मुलगा तासनतास आजी-आजोबांच्या सान्निध्यात. निमिषाला टेन्शन आलं या साऱ्याचं. मुलगा तसाही मोबाइलवर अभ्यास करत असतो, मग हे आजी-आजोबा का त्याला व्यसनाच्या आहारी घेऊन चाललेत. सकाळपासून हा आजी-आजोबांकडे. पण या तिघांचंही अलीकडे खाण्या-पिण्याकडे लक्ष नाहीये हे तिने जाणलं. एवढे कशात हे गर्क असतात तिघे.

अलीकडे तिच्या लक्षात येऊ लागलेलं, सासूच्या पानाच्या विड्यासाठी तंबाखू, कात, चुन्याची ऑर्डर ऐकू आली नाहीये. सासऱ्यांच्या विडीसाठी नातू सारखा धावताना दिसलेला नाहीये. कसं काय झालं हे, या साऱ्यांनी आपलं ऐकलं की काय? आपण बाहेर जे व्यसनमुक्तीचे धडे देत होतो, त्याचा असर झाला की काय? खरंच तिला क्षणभर स्वत:चा अभिमान वाटून गेला. ती हसली मनोमन समाधानाने आणि तिने हळून अभिमानाने आपले सासू-सासरे आणि आपला मुलगा कसे एकमेकांत रममाण झालेत याकडे एक कटाक्ष टाकला. पण क्षणभरातच तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

पाहिलं तर, सासूच्या हातात मुलाचा मोबाइल, सासऱ्याच्या हातात चिरंजीवांचा अर्थातच निमिषाच्या पतीचा मोबाइल आणि नातवाच्या हातात निमिषाचा मोबाइल… ‘धाड…. धाड… धाड… आजोबा घाला गोळ्या, मेलो मी, मेलो मी… आता आजीला पण मारा…’ म्हणून मुलगा मोठमोठ्याने ओरडत होता आणि आजी-आजोबा मोबाइलवर खटखट बटनं दाबत जराही न थांबता गेम खेळत होते. निमिषा क्षणभर थबकली. कधी शिकले हे सारे? आजी-आजोबा? ज्यांना आता नव्या पिढीचं हे व्यसन लागलं? तिने कपाळावरील घाम पुसला. हे कुणी शिकवलं यांना? कुणी शिकवलं हे? ती तोंडातच पुटपुटली.

तसे सासरे उभे राहिले म्हणाले, कुणी शिकवलं म्हणून काय विचारतेस? नातवानं शिकवलं आम्हा आजी-आजोबांना हे मोबाइलचे गेम खेळायला.

वेळ कसा जातो, तेच कळत नाही. याच्यामुळे माझी विडीही थोडी कमी झाली, सासू म्हणाली माझं पान खाण्यातही लक्ष नाही आतासं. व्यसन आपोआप सुटलं बघ. सासू असं बोलली, पण निमिषाने कपाळावर हात मारून घेतला. एका व्यसनापासून सुटलात तरी मोबाइलच्या व्यसनात तर गुरफटलात ना. निमिषाने आपल्या मुलाकडे रागाने पाहिलं आणि तिघांच्याही हातातील मोबाइल हिसकावून घेतले. सासरे म्हणाले, आता आमच्यासाठी दोन मोबाइल ऑर्डर कर तू, नातवाने गेम कसे खेळायचे ते शिकवलेत आम्हाला.

निमिषा मात्र मनातून पुरती घाबरली. कोणाला कोणापासून लांब ठेवायचं काही कळेनासं झालं तिला, मुलाला आजी-आजोबांपासून की आजी-आजोबांना मुलापासून? आजी-आजोबांना पान, सुपारी, तंबाखू, सिगारेटचं व्यसन, तर आपल्या मुलाला मोबाइलवर गेम खेळण्याचं व्यसन. तिघांनी एकमेकांना चांगले धडे दिलेत. तिने ठरवलं आजपासून बाहेर व्यसनमुक्तीचे धडे देणं बंद. जोवर घरातील माणसांना जडलेली व्यसनं बंद होत नाहीत आणि ती जोवर सुधारत नाहीत, तोवर व्यसनमुक्तीचे धडे सारे काही बंदच!

priyanip4@gmail.com

Recent Posts

१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…

11 minutes ago

Sachin Tendulkar: “हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…

42 minutes ago

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली…

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…

43 minutes ago

Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…

50 minutes ago

Ram Charan: अभिनेत्याच्या जिद्दीला सलाम! केलं कठोर व्रत आणि अखेर चित्रपटाला मिळालं ऑस्कर!

मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…

55 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २४ तासाच्या तपासाची माहिती! दहशतवाद्यांबद्दल ४ गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…

2 hours ago