Sunday, October 26, 2025
Happy Diwali

आला रे... मान्सून ४८ तासांत अंदमानात

आला रे... मान्सून ४८ तासांत अंदमानात

उष्म्याने हैराण झालेल्यांना मिळणार फार मोठा दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच फार मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, पुढच्या ४८ तासांत मान्सून अंदमानात धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यंदा मान्सून भारतात १० दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती.

त्यानंतर आता पुढील ४८ तासांनी नैऋत्य मोसमी पावसाची दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात आगमनाची दाट शक्यता असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचे नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या १२२ वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मान्सूनचे लवकर आगमन होणे, हा मोठा दिलासा ठरेल.

भारतीय किनारपट्टीवर २७ मेपर्यंत मान्सून पोहोचेल आणि पहिला पाऊस केरळमध्ये पडेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे, तर केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे बहुस्तरीय मध्यम ढग दाटले आहेत. तर गोवा, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांवरही ढगांची चादर पाहायला मिळत आहे. त्यामुळेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषत: १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. पण यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन नेहमीच्या वेळेपेक्षा काही दिवस आधी होण्याची शक्यता आहे. या वर्षी केरळमध्ये मान्सूनचे आगमन २७ मे रोजी ४ दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह होण्याची शक्यता आहे.

हिंद महासागरातून भारतात येणारे नैऋत्य वारे, ज्याला मान्सून म्हणतात. हे वारे वाहत भारतात पाऊस घेऊन येतात. भारताच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेसाठी मान्सून हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा