मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वेने गेल्या सहा वर्षांत तब्बल ७२ हजार नोकरीच्या संधी कायमच्या संपविल्या आहेत. यामध्ये शिपाई, वेटर, स्वीपर, माळी, शिक्षक आदी पदे आहेत. सरकारी कागदपत्रांनुसार रेल्वेच्या १६ झोनना २०१५-१६ ते २०२०-२१ या काळात ८१,००० पदे रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. ही पदे अनावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. कामाचे स्वरूप बदलले आहे तसेच तंत्रज्ञान आलेय यामुळे या कर्मचाऱ्यांची किंवा पदांची रेल्वेला आवश्यकता नाही, असे म्हटले होते. म्हणजेच या पदांवर यापुढे पुन्हा भरती केली जाणार नाही.
देशातील सर्वाधिक प्रवासी आणि मालवाहतूक एकटी रेल्वे करते. तसेच सर्वाधिक नोकऱ्या निर्माण होण्याचे स्थानही भारतीय रेल्वेच आहे. भारतीय रेल्वे ३० हून अधिक क्षेत्रांत काम करते. यामुळे रेल्वेमध्ये काम करणाऱ्यांची संख्याही काही लाखांत आहे.
झोननी ५६,८८८ पदे सरेंडर केली आहेत. तर आणखी १५,४९५ पदे सरेंडर केली जाणार आहेत. उत्तर रेल्वेने ९,००० हून अधिक पदे रद्द केली आहेत. द. प. रेल्वेने ४,६७७ पदे रद्द केली आहेत. द. रेल्वेने ७५२४ पदे आणि प. रेल्वेने ५७०० हून अधिक पदे सरेंडर केली आहेत. या आर्थिक वर्षात आणखी ९ ते १० हजार पदे रिक्त केली जाणार असल्याचे समजते.