नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळीत इमारतीला शुक्रवारी लागलेल्या आगीवर मध्यरात्रीनंतर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत एकूण २७ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.
पश्चिम दिल्ली परिसरातील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील सीसीटीव्ही तयार करणाऱ्या कंपनीच्या ३ मजली इमारतीला शुक्रवारी दुपारी ४.४० वाजता आग लागली. याची माहिती मिळतात अग्निशमन दलाचे २४ बंब तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. दिल्ली पोलिस, अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफच्या संयुक्त प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दुपारी लागलेली आग पूर्णपणे विझवण्यात मध्यरात्री १ वाजता यश मिळाले.
याप्रकरणी पोलिसांनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कंपनीच्या मालकांना अटक केली आहे. सदर इमारतीने फायर सेफ्टीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्रुटी ठेवल्याची चर्चा आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी आगीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत संवेदना व्यक्त केल्या आहेत.