मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनांवरील नामफलक मराठीत असावेत, असा निर्णय याआधीच झाला आहे. मात्र आता पालिकेकडून ज्या दुकानांनी आतापर्यंत नामफलक मराठीत केलेले नाहीत, त्यांना ३१ मेची डेडलाइन दिली आहे. दरम्यान ३१ मे पूर्वी सगळ्या आस्थापन, दुकानांना मराठीत नामफलक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मराठी अक्षरांचा टंक आकार हा इतर भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान नसावा, असे देखील सांगण्यात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरी व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारित अधिनियमात काही तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान नसावा. ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशी आस्थापने, नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे नसावीत, अशी तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे.
त्यानुसार ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे असल्यास वरीलप्रमाणे अधिसुचनेनुसार नामफलकात आवश्यक तो बदल करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे. ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची नावे नसावीत. त्यांना इतर बाबींची पूर्तता करण्यासाठी दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे.
मराठीत नामफलक लावण्याबाबत विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच गर्दीच्या ठिकाणी नामफलकाच्या दृष्टीने जनजागृती होण्यासाठी फलक लावावेत व त्याचा अहवाल प्रमुख अधिकारी, दुकाने व आस्थापना यांना सादर करावा, असे पालिकेकडून सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत विभागीय कार्यालयातील व्यापारी संघटनांचे सदस्य तसेच आस्थापनांचे मालक यांच्याशी बैठक घेऊन याबाबत अंमलबजावणीचे मार्गदशनही पालिकेकडून करण्यात येणार आहे.