मुंबई (प्रतिनिधी) : जॉनी बेअरस्टो, लिआम लिविंगस्टोन यांची तुफानी फलंदाजी आणि त्याला मिळालेली कगिसो रबाडाची अप्रतिम गोलंदाजी या जोरावर पंजाबने बंगळूरुवर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या बंगळूरुला बरी सुरुवात मिळाली असली तरी २१० धावांचे डोंगराएवढे लक्ष्य पाहता धावांना गती देण्याच्या प्रयत्नात विराट कोहली, फाफ डु प्लेसीस एकामागोमाग बाद झाले. त्यानंतर महीपाल लोमरोरचाही संयम सुटला.
रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल या जोडीने बंगळूरुची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. या जोडीमुळे बंगळूरुच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. मात्र संघाच्या १०४ धावसंख्येवर हे दोन्ही फलंदाज बाद झाले. त्यामुळे बंगळूरु अडचणीत सापडला. त्यानंतर या संघाला संकटातून बाहेर पडणे जमलेच नाही. कगिसो रबाडाने ३ मोहरे टिपत बंगळूरुच्या धावगतीला वेग लावला. त्यामुळे बंगळूरुला २० षटकांत १५५ धावांपर्यंतच मजल मारता आली.
तत्पूर्वी जॉनी बेअरस्टो आणि लिआम लिविंगस्टोन यांच्या धडाकेबाद खेळीमुळे पंजाबने २० षटकांत ९ फलंदाजांच्या बदल्यात २०९ धावांचे मोठे लक्ष्य उभारले. जॉनी बेअरस्टो आणि लिआम लिविंगस्टोन या दोघांनी बंगळूरुच्या गोलंदाजांना धु धु धुतले. बेअरस्टोने ४ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर २९ चेंडूंत ६६ धावांची मोठी खेळी केली. लिआम लिविंगस्टोनने ४२ चेंडूंत ७० धावा केल्या. त्यात त्याने ५ चौकार आणि ४ षटकार लगावले. बंगळूरुच्या वानींदू हसरंगा डी सिल्वाने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत केवळ १५ धावा देत २ बळी मिळवले. हर्षल पटेलला बळी मिळवण्यात यश आले मात्र तो धावा रोखण्यात फारसा यशस्वी झाला नाही. पटेलने ४ षटकांत ३४ धावा देत ४ बळी मिळवले.