मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १४ स्मशानभूमींमध्ये मृतदेह दहन करण्यासाठी लाकडाऐवजी ब्रिकेट्स बायोमासचा वापर करण्यात येणार आहे. या बाबतची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी महापालिका सार्वजनिक आरोग्य खात्याकडून मृतदेह दहनासाठी विविध पर्यायांची चाचपणी करण्यात आली. या चाचपणीअंती ‘शेती कचरा व वृक्ष कचरा’ यापासून तयार केलेल्या ब्रिकेट्स बायोमासचा वापर हा तुलनेने अधिक पर्यावरणपूरक असल्याचे निदर्शनास आले आहे. पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड हे मुंबई महानगरपालिकेद्वारे मोफत पुरविण्यात येते. हे ३०० किलो लाकूड साधारणपणे २ झाडांपासून मिळते. मात्र, आता पर्यावरणपूरकतेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी ब्रिकेट्स बायोमासचा वापर करण्यात येणार आहे.
दरम्यान पहिल्या टप्प्यात मुंबई महापालिकेच्या ज्या १४ स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी ब्रिकेट्स बायोमासचा वापर करण्यात येणार आहे. त्या स्मशानभूमींमध्ये दर वर्षी साधारणपणे ६ हजार २०० इतक्या मृतदेहांना अंतिम निरोप देण्यात येतो, तर वर्षभरात साधारणपणे १८ लाख ६० हजार किलो एवढ्या प्रमाणातील लाकडांचा वापर मृतदेह दहनासाठी होतो. प्रत्येक मृतदेह दहनासाठी ३०० किलो लाकडाची गरज असते. मात्र लाकडांपेक्षा ब्रिकेट्स बायोमासमुळे प्राप्त होणारी ज्वलन उष्णता अधिक असल्याने प्रत्येक मृतदेहासाठी २५० किलो ब्रिकेट्स बायोमास पुरेसे असते.
दरम्यान ‘डी’ विभागातील मंगलवाडी स्मशानभूमी, ‘ई’ विभागातील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी, ‘एफ उत्तर’ विभागातील गोयारी हिंदू स्मशानभूमी, ‘जी उत्तर’ विभागातील धारावी हिंदू स्मशानभूमी, ‘एच पश्चिम’ विभागातील खारदांडा हिंदू स्मशानभूमी, ‘के पश्चिम’ विभागातील वर्सोवा हिंदू स्मशानभूमी, ‘पी उत्तर’ विभागातील मढ हिंदू स्मशानभूमी, ‘आर दक्षिण’ विभागातील वडारपाडा हिंदू स्मशानभूमी, ‘आर उत्तर’ विभागातील दहिसर हिंदू स्मशानभूमी, ‘एल’ विभागातील चुनाभट्टी हिंदू स्मशानभूमी, ‘एम पूर्व’ विभागातील चिताकॅम्प हिंदू स्मशानभूमी, ‘एम पश्चिम’ विभागातील आणिक गाव हिंदू स्मशानभूमी, ‘एस’ विभागातील भांडुप गुजराती सेवा मंडळ स्मशानभूमी आणि ‘टी’ विभागातील मुलुंड नागरिक सभा हिंदू स्मशानभूमी अशा १४ स्मशानभूमींचा समावेश आहे. स्मशानभूमींमध्ये ‘ब्रिकेट्स बायोमासचा वापर करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले आहे.