मुंबई : मुंबई बँक कथित मजूर प्रकरणात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह तिघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल ९०४ पानी आरोपपत्रात प्रवीण मर्गज आणि श्रीकांत कदम या दोघांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध भादंवि कलम १९९, २००, ४०६, ४१७, ४२०, ४६५ ,४६८, ४७१ आणि १२० ब यांचा समावेश आहे. मात्र या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
या आरोपपत्रात प्रवीण दरेकर यांच्यासोबतच मुंबई बँक कथित मजूर प्रकरणात बेलार्ड पियर मेट्रोपोलिटन कोर्टात मुंबई पोलिसांकडून शुक्रवारी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एकूण २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. त्यात तीन पोलीस अधिकारी, एक उपजिल्हाधिकारी, काही शासकीय अधिकारी तर काही मुंबई बँकेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्या विरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दरेकर यांनी बँकेच्या निवडणुकीत बोगस कागदपत्रे देऊन उमेदवारी दाखल केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सन १९९७ मध्ये प्रतिज्ञा सहकारी सोसायटीचा सदस्य म्हणून दरेकर यांनी मजूर नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांनी १० वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आमदार म्हणून निवडून आल्यावर देखील त्यांनी ही नोंद कायम ठेवली होती, असा आरोप करण्यात आला होता.