पॅरिस (वृत्तसंस्था) : रशियाविरुद्धच्या युद्धामुळे होरपळत असलेल्या युक्रेनने जवळपास दोन महिन्यांनंतर जगाला चांगली बातमी दिली आहे. त्यांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने रशियन हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सामना जिंकला आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या एका मैत्रीपूर्ण लढतीत युक्रेनने जर्मन क्लब बोरोसिया म्योंचेनग्लाडबाखला २-१ असे पराभूत केले. मदत निधीसाठी हा सामना खेळला गेला होता. या सामन्यातून रशिया-युक्रेन युद्धातील बळींना मदत केली जाणार आहे. हा सामना बोरोसिया पार्क स्टेडियममध्ये खेळला गेला.
रशियन हल्ल्याच्या ७७ दिवसांनंतर बुधवारी युक्रेनचा संघ मैदानात उतरला. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हजारो प्रेक्षक युक्रेनचे झेंडे घेऊन स्टेडियममध्ये आले होते. त्यांच्यापैकी काही जणांच्या हातात युक्रेनचे खेळाडू आणि त्यांच्या देशाच्या समर्थनार्थ लिहिलेले पोस्टर होते. युक्रेनचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू एंड्री वरोनिन एका वाहिनीशी बोलताना म्हणाले की, हा सामना आमचा संघ आणि देशासाठी महत्त्वपूर्ण होता. आम्ही एकटे नसून संपूर्ण जग आमच्या पाठीशी असल्याची जाणीव या निमित्त आम्हाला झाली.