ठाणे (प्रतिनिधी) : ठाण्यातील रस्ते लवकरच कात टाकणार आहेत. राज्य नगरविकास विभागाने दिलेल्या अनुदानातून ठाणे शहरांतील १२७ रस्त्यांचा विकास करण्याचा महापालिकेचा मनोदय आहे.राज्याच्या नगरविकास विभागाकडून मिळालेल्या २१४ कोटींच्या अनुदानाच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने रस्ते विकासाचा मास्टर प्लॅन तयार केला असून या प्लॅनच्या माध्यमातून ठाणे शहरातील ५३ कि.मी रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये ८२.५९ कोटींचे डांबरी रस्ते, ९५.६२ कोटींचे यूटीडब्लूटी, तर ३५.७९ कोटींच्या डांबरी रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
पावसाळा वगळून एका वर्षात या रस्त्यांचा विकास करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने ठेवले असून या रस्ते विकासानंतर शहरातील प्रवास वेगवान होणार असून वाहतूक कोंडीपासून देखील दिलासा मिळणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून ठाण्यातील १२७ रस्त्यांसाठी सुमारे २१४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीच्या माध्यमातून १२७ रस्त्यांचे युटीडब्लूटी, डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या निधीचे सर्व प्रभागातील रस्त्यांचा समावेश करून त्यांची कामे करण्यात येणार आहे; परंतु दिवा-शिळ, नौपाडा-कोपरी या प्रभागांमध्ये सर्वाधिक निधी उपलब्ध केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून प्राप्त निधीच्या विनियोगामध्ये सत्ताधाऱ्यांचा सर्वाधिक समावेश असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रभाग निहाय निधीचे वाटप करताना नौपाडा कोपरीला ४९ कोटी, माजिवडा-मानपाडा २४ कोटी, कळवा ८ कोटी, लोकमान्य, सावरकरनगर – २२ कोटी २६ लाख, वागळे इस्टेट – २६ कोटी, वर्तकनगर – १६ कोटी आणि मुंब्रा येथे ७ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या रस्ते विकासाच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आता या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.