Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीतीव्र उन्हाचा चटका अर्थकारणालाही!

तीव्र उन्हाचा चटका अर्थकारणालाही!

उदय निरगुडकर

यावर्षी जाणवणाऱ्या तीव्र उन्हाळ्याचा मोठा आर्थिक फटका शेतीला आणि दैनंदिन व्यवहाराला बसत आहे. वीज कपातीला तोंड द्यावं लागत आहे. वीज नसल्यामुळे कारखाने चालत नाहीत, त्यामुळे उत्पादकता कमी होते. परिणामी उत्पादनांच्या किमती अनाठायी वाढणार आहेत किंवा त्या वस्तूंच्या विक्रीतून कंपन्यांना होणारा फायदा घटणार आहे. यामुळे त्यांच्या एकूणच आर्थिक नियोजनाला मोठा फटका बसणार आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे दोन्ही देश कडक उन्हाळ्याच्या फटक्याने अक्षरशः बेजार झाले आहेत. त्यातच भारतातल्या अनेक भागांमध्ये सध्या विजेचं संकट निर्माण झालं आहे. कोळसा उपलब्ध नसणं आणि त्याच्या नियोजन-वितरणातला दोष, राज्य सरकारचा गलथानपणा यामुळे हे संकट तीव्र बनलं आहे. विशेषतः उत्तर भारतामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागात ‘पॉवर कट’ची परिस्थिती असल्यामुळे हा उन्हाळा अधिक दुष्कर वाटायला लागला आहे. एकूणच उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड उन्हाळा, पावसाळ्यात प्रचंड पाऊस, तर हिवाळ्यात कडक थंडी अशा प्रकारच्या वातावरणाला आपल्याला सामोरं जावं लागत आहे. ही पर्यावरणीय विषमता, उद्योगधंदे, शेती व्यवसाय आणि आरोग्य यासाठी हानिकारक आहे.

एकीकडे वीज उपलब्ध नसताना दुसरीकडे विजेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते. परिणामी, भारताच्या बहुतांश कानाकोपऱ्यांमध्ये सध्या चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस इतकं प्रचंड तापमान अनुभवायला मिळत आहे. यातलं वैशिष्ट्य म्हणजे पारा मार्च महिन्यामध्येच ४० च्या वर गेला. हिवाळा ते उन्हाळा असं संथ संक्रमण आपल्याला यंदा पाहायला मिळालं नाही. पडदा पडावा तसा हिवाळा खटकन संपला आणि दुसऱ्या दिवशी कडक उन्हाळा सुरू झाला. वातावरण बदलाचं हे एक नवीन चित्र आपल्या डोळ्यांसमोर आहे. तापमान प्रचंड वाढलं की, आपल्याकडे पाऊस पडतो आणि जमीन आणि हवामान थंड होतं. परंतु सध्या भारतात कुठेही ढग जमलेत असं दिसत नाही. त्यामुळे सूर्याची उष्णता थेट जमिनीवर आणि जनमानसावर पडत आहे. त्यामुळे जीणं अतिशय दुष्कर होऊन गेलं आहे. त्याचा परिणाम म्हणून ओरिसामध्ये शाळा बंद करण्यात आल्या. पश्चिम बंगालमध्येदेखील काही ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्यांचा परिणाम सर्वांच्या तब्बेतीवर व्हायला लागला आहे. त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर देखील झालेला दिसतो.

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमधल्या उन्हाच्या तडाख्याने बळी गेलेल्यांची संख्या २१ पर्यंत पोहोचली. इतकं दाहक भीषण असं चित्र आता हवामानाच्या बाबतीत आपल्याकडे घडतंय. लक्षात घ्या, याच काळामध्ये पावसाळ्यापूर्वी जमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना उन्हातान्हात अक्षरशः ४०-४५ डिग्रीमध्ये तासनतास राबावं लागतं. त्याच उन्हाच्या कडाक्यात अनेक शेतकऱ्यांच्या तब्बेती बिघडतात. अतिसार आणि निर्जलीकरण अशा व्याधींना बळी पडावं लागण्याचा हाच काळ. या काळात आणखी एक गोष्ट बहुतांशी वेळा खेडेगावात, जंगलात दिसते, ती म्हणजे जंगलामध्ये आगी लागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं. हे सगळं अचानक घडतंय का? तर त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. वातावरण बदलाचे किंवा जागतिक तापमानवाढीचे अहवाल काढून बघा, त्या प्रत्येक अहवालात हा धोका वर्तवण्यात आला होता. दर वर्षी आपण तापमानवाढीचे उच्चांक पाहतोय. कधी १२० वर्षांमधला सर्वात कडक उन्हाळा, तर कधी शंभर वर्षांमधला सर्वात भीषण पाऊस, तर कधी ८० वर्षांमधली सर्वात जोरदार थंडी या सर्वाला आपण तोंड देतोय. सध्या आपण अनुभवत असलेल्या उन्हाळ्याची तीव्रता गेले सहा आठवडे कमी झाली नाही. ज्याला आपण उष्णतेच्या लाटा म्हणतो, ती परिस्थिती आपल्याकडे सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या सुरुवातीला येईल असं जाहीर केलं गेलं होतं. परंतु यावेळी मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच उष्णतेच्या अशा लाटा आल्या. या सगळ्यांवरून पर्यावरण बदलाची तीव्रता आपल्या लक्षात येईल.

एकूणच हवामानाचा एक पॅटर्न ठरलेला आहे. समुद्राचं गरम पाणी पॅसिफीकमधून भारताकडे यायला सुरुवात होते. त्यातून गरम वाऱ्यांच्या दिशा या भारताकडे येतात. गरम वाऱ्यांमुळे संपूर्ण देशभर एक गर्मीचं वातावरण निर्माण होत असतं. हा काहीसा तांत्रिक विषय. परंतु हे सर्व आपल्या जीवनाशी, जीवन व्यवहाराशी आणि अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. पर्यावरण बदलामुळे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम लक्षणीय आहेत. पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या तापमानवाढीचा परिणाम जनावरांबरोबरच मनुष्यावरही होतो. या सगळ्याला इंग्रजीत डिहायड्रेशन (निर्जलीकरण) असं म्हणतात. त्याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागतो. म्हणजे घाम येतो पण तो सुकत नाही. त्यामुळे आणखी भीषण परिस्थिती उद्भवते. गेले काही दिवस मी अमरावती, अचलपूर, नागपूर या भागांत एका शोध समितीचा प्रमुख म्हणून काम करत होतो. यापूर्वी देखील ऐन उन्हाळ्यात मी विदर्भात आलो आहे. पण यावेळी काही तरी वेगळं होतं. असं जाणवलं की, रात्रीचं तापमानदेखील थंड होत नाही. त्यामुळे शरीराचं आणि जमिनीचं तापमानही कमी होताना दिसत नाही. जमिनीचं तापमान दिवसा जसं असतं तसंच रात्रीदेखील जाणवतं. त्यामुळे दिवसा त्याची तीव्रता वाढलेली असते. रात्री जमीन थंडच होत नाही. या सगळ्याशी आपला जीवन व्यवहार जुळवून कसा घ्यायचा हा खरा सवाल आहे. त्याच्या प्रशिक्षणाची गरज आहे. याचं कारण आपल्या भविष्याचा आणि वर्तमानाचा तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या आनुषंगाने आणखी एका विषयाकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे. या तापमान वाढीचे काही भीषण आर्थिक परिणाम संभवतात.

एक तर तापमान वाढीमुळे या वर्षीचा उन्हाळा आपल्याकडे मार्चच्या पहिल्या आठवड्यातच आला. त्यामुळे हिवाळा ते उन्हाळा हे संक्रमण झालंच नाही. त्याचा फार मोठा आर्थिक फटका आमच्या शेतीला आणि जीवन व्यवहाराला बसला. त्यामुळेच गेल्या दशकातला नव्हे, तर गेल्या जवळपास ३८ वर्षांमधला हा सर्वात तीव्र उन्हाळा आहे, असं हवामान खात्याने जाहीर केलं. त्यात पुन्हा आपल्याकडे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे या उष्णतेच्या लाटेचे दुष्परिणाम अधिक काळ आणि अधिक तीव्रतेने जाणवतात. त्यामुळेच आपल्याला वीज कपातीला तोंड द्यावं लागत आहे. वीज नसल्यामुळे कारखाने चालत नाहीत, कारखाने चालत नाहीत म्हणून उत्पादकता कमी, उत्पादकता कमी राहिल्यामुळे तयार होणाऱ्या वस्तूंच्या किमती अनाठायी वाढणार आहेत किंवा त्या वस्तूंच्या विक्रीतून कंपन्यांना होणारा फायदा घटणार आहे. नफा कमी झाल्यामुळे त्यांच्या एकूणच आर्थिक नियोजनाला मोठा फटका बसणार आहे.

महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये दुपारच्या वेळी दुकानं शटर संपूर्ण किंवा अर्धं खाली करून बंदच राहतात. त्यामुळे तिथले खरेदी-विक्रीचे व्यवहार नीट होत नाहीत. दुपारच्या वेळी शेतीची कामं जवळपास किंवा अत्यंत थंडावलेली असतात. त्यामुळे त्याचीदेखील उत्पादकता कमी झालेली असते. लक्षात घ्या, आपल्याकडच्या एकूण कामगारांपैकी जवळपास ४५ ते ५० टक्के लोकांना रस्त्यावर किंवा शेतामध्ये उतरून काम करावं लागतं. त्या सगळ्यांना या प्रचंड उन्हाच्या तडाख्याचा त्रास होतो. म्हणून त्यांच्या केवळ तब्बेतीवर नाही तर उत्पादतेकवरदेखील परिणाम होतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे युक्रेन आणि रशियादरम्यानच्या युद्धामुळे भारताला गहू निर्यातीमध्ये फार मोठी संधी उपलब्ध झाली. परंतु उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की गव्हाच्या अपेक्षित उत्पादनाच्या, म्हणजे १२२ मिलीयन मेट्रिक टनामध्ये सुमारे १५ टक्क्यांनी घट होईल, असा धोक्याचा इशारा कृषिक्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिला आहे. आपल्याकडे तयार होणाऱ्या जिऱ्यासारख्या अनेक मसाल्याच्या पदार्थांनादेखील जोरदार फटका बसतो आहे. त्यांची उत्पादकता १५ टक्क्यांनी कमी होत आहे. २०२९ पर्यंत आपण पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष समोर ठेवलं आहे, त्या सगळ्याला अशा गोष्टींमुळे काहीशी खीळ बसते आहे, हे नक्की. हे झालं देशपातळीवरचं. सध्या सर्वांनी उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी जे जे करता येईल ते जरूर करावं. उन्हाळा बाधत नाही हे दाखवून द्यावं. यातूनच उनामुळे बसणारा आर्थिक फटका टाळता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -