विक्रमगड (वार्ताहर) : तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल विभागाकडून विविध भागातील कार्यक्षेत्रानुसार जमीन महसूल व गौण खनिजांच्या अवैध धंद्याविरोधात मोहीम राबवली. महसूल नायब तहसीलदार, विविध सज्जातील तलाठी यांच्या पथकाने डबर, खडी व इतर गौण खनिज चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून आतापर्यत ६ कोटी ७३ लाख २० हजारांची दंडवसुली केल्याची महसूल विभागाने माहिती दिली.
जमीन महसूल व चोरट्या मार्गाने डबर, माती, खडी अशा गौण खनिजाची वाहतूक व उत्खन्न करण्याऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून दंडवसुलीचे आदेश दरवर्शी प्रत्येक तहसील कार्यालयास देण्यात येतात. परंतु सद्यस्थितीत गौण खनिज उत्खन्नाबाबत केंद्रीय वन व पर्यावरण विभागाची परवानगी अनिवार्य केल्याने चोरट्या मार्गाने गौण खनिज वाहतूक संख्या अधिक होत आहे.
परंतु महसूल विभागाने सतर्क राहून चोरट्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून जमीन महसूल दंडवसुली ९९ लाख ९१ हजार तर गौणखनिज दंडवसुली ५ कोटी ७३ लाख २९ हजारांची वसुली केली आहे. या वर्षांत अशीच मोहीम राबवून यापुढेही दंडवसुली केली जाईल, असेही महसूल विभागाने सांगितले आहे. शासनाकडून जमीन महसुलाकरीता १ कोटीं वसुलीचा इश्टांक देण्यात आला होता. त्यामध्ये ९९ लाख ९१ हजाराची दंडवसुली, तर चोरट्या गौणखनिचा इश्टांक १ कोटी ६१ लाख ८५ हजार असताना चारपट वसुली करीत ५कोटी ७३ लाख २९ हजार अशी एकूण ६ कोटी ७३ लाख २० हजारांची दंडाची वसुली केली आहे.