नेरळ (वार्ताहर) : माथेरान नळपाणी योजनेसाठी नेरळ जवळील कुंभे येथे उल्हास नदीवरून होणारा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे गेली चार दिवस माथेरानमध्ये होणारा पाणीपुरवठा शार्लोट लेक मधून होत आहे.
दरम्यान, माथेरानमध्ये सध्या पर्यटन हंगाम असून पर्यटकांसाठी अधिकच पाणी साठा आवश्यक असल्याने पाणी पुरवठा नेरळ कुंभे येथून होणे महत्वाचे आहे. मात्र कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने चार दिवसांपासून कामगारांचा संप माथेरानसाठी न परवडणारा आहे. तर दुसरीकडे माथेरान नळपाणी योजनेतून माथेरान डोंगरातील ज्या चार आदिवासी वाड्याना पिण्याचे पाणी पुरविले जाते त्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
माथेरान नळपाणी योजनेसाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने या कंत्राटी कामगारांनी नळपाणी योजनेचे काम बंद केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे उल्हासनदी येथून माथेरानकडे जाणारे पाणी चार दिवसांपासून सोडले गेले नाही. त्याचा परिणाम माथेरानमधील पर्यटन हंगामावर होण्याची शक्यता आहे. कारण सध्या माथेरान मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक असून पिण्याच्या पाण्याची सध्याच्या उन्हाळ्यात वाढलेली मागणी लक्षात घेऊन माथेरान शहरात असलेल्या शार्लोट लेकमधील पाणी उचलले जात आहे.
आधीच पाण्याची पातळी खालावलेल्या शार्लोट लेक मधील पाणी दररोज पाणी उचलून आणखी कमी होऊन मोठी पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तत्काळ कंत्राटी कामगारांचा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे. त्या १७ कामगारांनी नेरळ ग्रामपंचायतमधील पंप हाऊस जुम्मापट्टी, कुंभे येथील उद्धव पंप या ठिकाणी कामबंद आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू ठेवले आहे.
परिणाम आदिवासी वाड्यांवर
जुम्मापट्टी, धनगर वाडा, धसवाडी आणि माणगाव वाडी या चार ठिकाणी मागील तीन दिवस पाणी गेले नाही आणि त्यामुळे तेथे पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक आदिवासी लोकांना वणवण भटकावे लागत आहे.
शार्लोट लेकमध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ काढणायचे काम मंजूर केले असून ते लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -सुरेखा भणगे, प्रशासक, माथेरान गिरिस्थान नगरपरिषद
माथेरान शहरातील शार्लोट लेक मधील पाण्याचा साठा कमी झाला आहे आणि त्यात सलग आठ दिवस पाणी उचलले गेल्यास लेक कोरडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच कंत्राटी कामगारांचा प्रश्न मार्गी लावून पाणी कुंभे येथून उचलण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. -एस. ए. भोसले, उपअभियंता