Friday, October 31, 2025
Happy Diwali

नवी मुंबईत भरणार पहिला फ्लेमिंगो महोत्सव

नवी मुंबईत भरणार पहिला फ्लेमिंगो महोत्सव

उरण (वार्ताहर) : जागतिक स्थलांतरित पक्षी दिनानिमित्त नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी १४ मे रोजी शहरात फ्लेमिंगो महोत्सव भरविण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबईतील अशा प्रकारचा हा पहिलाच महोत्सव असणार आहे. विशेष म्हणजे, स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत महापालिकेने नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटीचा दर्जा देण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे.

त्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जगभरातील स्थलांतरित पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात जागतिक स्तरावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी मे आणि सप्टेंबर महिन्यात असे दोन वेळा जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस साजरा केला जातो.

या अंतर्गत स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊहापोह केला जातो. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण मोठे आहे. या परदेशी पाहुण्यांच्या स्थलांतराच्या जागा सुरक्षित कराव्यात, यासाठी पर्यावरणप्रेमींचा संघर्ष सुरू आहे. त्याला मोठ्या प्रमाणात यशही प्राप्त झाले आहे.

शहरातील स्थलांतरित पक्ष्यांचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेऊन, नवी मुंबई महापालिकेनेही सकारात्मक पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी मुंबईला प्लेमिंगो सिटीचा दर्जा दिला आहे. त्यानुसार, शहरात ठिकठिकाणी फ्लेमिंगोंचे आकर्षक शिल्प उभारले आहेत. पालिकेच्या या प्रयासाला बळ देण्याच्या हेतूने आता नवी मुंबईत पहिला फ्लेमिंगो महोत्सव भरविणार आहे.

Comments
Add Comment