संतोष वायंगणकर
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या उभारणीत आणि शिवसेना वाढविण्यात कोकणचा मोठा वाटा आहे. त्याकाळच्या मुंबईकर चाकरमानी नोकरी-व्यवसायानिमित्ताने मुंबईत गेला तो कष्ट करीत राहिला आणि शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेला तरुण शिवसेनेकडे ओढला गेला. मुंबईत शिवसेना उभी राहिली ‘ती’ कोकणातील तरुणांच्या जोरावर. यामुळे मुंबई महानगरपालिकेत सामान्य शिवसैनिक नगरसेवक होऊ शकला.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा शिवसेनेचा ‘बेस’ होता. याच ८० टक्के समाजकारणाचा प्रभाव त्याकाळच्या तरुणांवरती झाला. नंतरच्या काळात टक्केवारीच्या राजकारणात राजकारण ८० टक्के आणि समाजकारण २० टक्के अशी उलट स्थिती शिवसेनेची झाली. १९९० नंतर कोकणातही शिवसेना वाढली, विस्तारली याच जोरावर १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून सत्तेवर आली. २०१४ मध्येही शिवसेना सत्तेत होती. २०१९ मध्ये शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीय माध्यमातून शिवसेना सत्तेवर आहे. या महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात पक्षीय स्तरावर सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झाला. हे जुने जाणते शिवसैनिकच बोलताना दिसतात. निष्ठावान शिवसैनिक मागे पडले आणि बाहेरून दुसऱ्या पक्षातून आलेले मंत्री, आमदार झाले. शिवसेनेकडून कोणतेही विकासाचे नियोजन झालेले नाही. कोकणचा विचार करता ना. अनिल परब, ना. उदय सामंत हे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत; परंतु कोकणच्या विकासासाठी यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. हे आता शिवसैनिकच चर्चा करताना दिसतात.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाला गती येण्याऐवजी पूर्णत: विकासप्रक्रियाच ठप्प झाली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री असलेले ना. अनिल परब १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी ध्वजारोहनापुरतेच जिल्ह्यात येतात. यामुळे कोकणच्या विकासाचे कोणतेही देणे-घेणे त्यांना नाही. यातच उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर समारंभात राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम व आपले कसे राजकिय ‘मेतकूट’ आहे. या मेतकूटामुळे ५० हजाराचे मताधिक्य तोडून शिवसेनेचे माजी आ. सदानंद चव्हाण यांचा कसा पराभव झाला याचे गुपितच उदय सामंत यांनी मांडले. कोकणातील शिवसेना नेत्यांमध्ये किती आणि कसे सख्य आहे? हे अनेकवेळा पुढे आले आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आ. रामदास कदम, आ. भास्कर जाधव, ना. उदय सामंत, आ. योगेश कदम, ना. अनिल परब, खा. विनायक राऊत या सर्वांचे विळ्या-भोपळ्याचे नातं आहे. रामदास कदम यांनी शिवसेनेत आपणाला कसं वागवलं जातंय, याविषयी सहा महिन्यांपूर्वीच खदखद व्यक्त करण्यात आली होती. कोकणातील ज्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी परिश्रम, कष्टाने शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न केला तो शिवसैनिक मात्र आता प्रामाणिकपणे काम करत राहिला. मात्र, त्याची साधी कोणी दखलही घेत नाही. कोणी विचारपूसही करत नाही. हीच त्याची खंत आहे.
सिंधुदुर्गातही आ. वैभव नाईक, माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीवरही सामान्य शिवसैनिक नाराजी व्यक्त करतात. या काँग्रेसी विचारांच्या शिवसैनिकांमुळे कट्टर शिवसैनिक बाजूलाच पडलेला आहे. राज्यमंत्रीपद गेल्यामुळे आ. दिपक केसरकर नाराजच होते. त्यांना अलीकडे सिंधु-रत्न विकास मंडळाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. मध्यंतरी आ. दिपक केसरकर यांनी ना. उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कोकणातील शिवसेनेतील हा अंतर्गत संघर्ष आता चिपळूणच्या शिवसैनिकांच्या बैठकीच्या निमित्ताने उफाळूनच आला आहे. महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेला कोकणात कोकणासाठी म्हणून काय करता आले तर या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळू शकेल. कोट्यवधी रुपयांच्या फसव्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अन्य कोकणातील कोणताही विकास प्रकल्प किंवा पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. या सुविधा पुरविण्याचा प्रयत्नही झालेला नाही. महाराष्ट्र सरकारकडून कोकणच्या विकासासाठी किती निधी आला हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेल्यावर समजून येईल.
आमदार, खासदार विकासनिधी ऐवजी अन्य कोणताही विकासनिधी आला नाही. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध होऊ शकेल. यामुळे ही माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकेल. यामुळे मंत्री, आमदार, खासदार यांच्याकडून जाहीर होणारी कोट्यवधी रुपयांची जाहीर होणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष आलेला निधी हे पाहाण्यासाठी तटस्थतेचा चष्मा लावून पाहिल्यास कोकणच्या विकासात काहीही निधी आलेला नाहीम हे स्पष्ट होईल. कोकणातील सामान्य शिवसैनिकांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना बदलण्याची मागणी केली आहे, तर उदय सामंत यांचाही राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी चिपळूणच्या बैठकीत उघडपणे शिवसैनिकांनी केली.