Sunday, September 14, 2025

यमुना एक्सप्रेस वेवरील अपघातात महाराष्ट्रातील चौघांसह कर्नाटकच्या एकाचा मृत्यू

यमुना एक्सप्रेस वेवरील अपघातात महाराष्ट्रातील चौघांसह कर्नाटकच्या एकाचा मृत्यू

आग्रा (हिं.स.) : उत्तर प्रदेशात यमुना एक्सप्रेस वे वर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघातात महाराष्ट्रातील चार जणांसह कर्नाटकच्या एकाचा मृत्यू झाला आहे. आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळच्या सुमारास बोलेरो आणि डम्पर यांच्यात धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात बोलेरो गाडीतील सात पैकी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात एक्सप्रेस वे वरील ४० किमी माइलस्टोन जवळ झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या पाच पैकी चौघे जण हे महाराष्ट्रातील बारामती येथील रहिवासी आहेत. तर अपघातात दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा तपशील चंद्रकांत नारायण बुराडे (६८), स्वर्णा चंद्रकांत बुराडे (५९), मालन विश्वनाथ कुंभार (६८), रंजना भरत पवार (६०) आणि नुवंजन मुजावर (५३) बेळगाव, चिकोडी कर्नाटक असा आहे. डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस आरोपी चालकाचा शोध घेत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कटरने वाहन कापून जखमींना बाहेर काढले.

ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी विशाल पांडे यांनी सांगितले की, ड्रायव्हरला झोप लागल्याने बोलेरो डंपरमध्ये घुसली असण्याची शक्यता आहे. मृत हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे ५ वाजता जेवार टोल प्लाझाजवळ झाला. अपघातानंतर सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. अन्य दोघे जण नारायण कोळेकर आणि सुनीता गेस्ते हे जखमी झाले असून त्यांच्यावर कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. जखमींवर उपचार करण्याच्या सूचना देखील त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

Comments
Add Comment