Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाभारतीय महिला बॅडमिंटन संघ उबेर चषकातून बाहेर

भारतीय महिला बॅडमिंटन संघ उबेर चषकातून बाहेर

पी. व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखालील भारत थायलंडकडून ३-० असा पराभूत

बँकॉक (वृत्तसंस्था) : दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला बॅडमिंटन संघ गुरुवारी बँकॉकमध्ये उबेर चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडकडून ०-३ ने पराभूत झाला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूचा सलग दुसऱ्या दिवशी पराभव झाला आणि पहिल्या एकेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या रत्चानोक इंतानोनकडून २१-१८, १७-२१, १२-२१ असा ५९ मिनिटांत पराभवाचा सामना कारावा लागला.

याआधी बुधवारी भारताच्या ड गटातील अंतिम सामन्यात सिंधूला जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोरियन खेळाडू एन सेओंगकडून सरळ गेममध्ये १५-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला होता. या साखळी लढतीत भारतीय संघाचा कोरियाविरुद्ध ०-५ असा पराभव झाला होता. उपांत्यपूर्व फेरीत वाटचाल करण्याआधी हा धोक्याचा इशारा संघाला मिळाला होता पण त्यातून संघ सावरला नसल्याचेच या पराभवामुळे दिसून आले.

उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर सिंधूचा इंतानोनविरुद्ध पराभवाची कामगिरी ४-७ अशी झाली आहे. महिला दुहेरीत श्रुती मिश्रा आणि सिमरन सिंघी जोडीला जोंगकोल्फन कितिथाराकुल आणि रविंदा प्रजोंगझाई यांच्याकडून १६-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे भारत ०-२ ने पिछाडीवर होता. त्यानंतर तिसऱ्या लढतीत मुख्य लक्ष आकर्षी कश्यपवर होते. पण ४२ मिनिटे चाललेल्या दुसऱ्या एकेरीच्या लढतीत तिलाही पोर्नपावी चोचुवाँगकडून १६-२१, ११-२१ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे पाच सामन्यांच्या लढतीत थायलंडने ३-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आणि उर्वरित दोन सामने बाकी राहिले होते. केवळ औपचारिकता राहिली, त्यामुळे ते खेळायचे नाही असे ठरले.

उबेर चषक उपांत्यपूर्व फेरीत त्यानंतरच्या उर्वरित दोन सामन्यांतील दुसऱ्या महिला दुहेरी सामन्यात, तनिषा क्रॅस्टो आणि ट्रिसा जॉली या भारतीय जोडीचा सामना बेन्यापा एम्सार्ड आणि नुंटकर्ण एम्सार्ड यांच्याशी होणार होता, तर महिला एकेरीत अश्मिता चालिहाला बुसानन ओंगबामरुंगफानचा सामना करावा लागणार होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -