ठाणे (प्रतिनिधी) : यंदा पाऊस लवकर असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, परंतु मासेमारी करणाऱ्या काही मासेमारांना यंदाच्या पावसाळ्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. मासेमारी करणारे समुद्राच्या जवळ असतात, निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने त्यांना निसर्गाची भाषा अवगत असते. त्यांच्या अंदाजानुसार लवकर पाऊस पडेल असे वातावरण असून गेले दोन दिवस ऊन-सावलीचा खेळ आणि अधूनमधून वारे वाहत आहेत.
भर दुपारच्या सुमारास जो पारा गेले आठवडाभर ४३ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता, तो आता ४० अंश सेल्सियसच्या खाली आला आणि तापमान ३७ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. वातावरणात होत असलेले हे बदल पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
यंदा पाऊस लवकर सुरू होईल असे भाकीत सर्वच जण वर्तवित आहेत. या पार्श्वभूमीवर अगदी निसर्गातील बहावा, गुलमोहर वृक्ष यांचा बहर नजरेत भरत आहे. तसेच नदीवर मासेमारी करणाऱ्या काही मासेमारांचे म्हणण्यानुसार नदीतील अरले, मळ्याच्या माशांच्या पोटात चक्क अंडी तयार झाल्याचे आढळून येत आहे. पाऊस जवळ आला की गाभोळी मासे जाळ्यात सापडायला सुरुवात होत असते.
भरपूर पाऊस आणि नदीला पाणी वाढले की, मासे गढूळ पाण्यात अंडी सोडतात. गाभोळी (अंडी भरलेले) वल्गनीचे मासे म्हणजे खवय्यांना खास मेजवाणीचा काळ असतो.