उरण (वार्ताहर) : उरण तालुक्यातील माणकेश्वर समुद्रकिनारी बॉम्ब सदृश्य नळकांड्या सापडल्याने उरण परिसरामध्ये खळबळ माजली होती. तपासणीनंतर या कांड्या मोठ्या जहाजांवर सिग्नल देण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लायर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर जनतेने सुटकेचा निःश्वास सोडला.
उरणच्या माणकेश्वर समुद्र किनारी सकाळी १० च्या सुमारास किनाऱ्यावर खेळणाऱ्या मुलांना काही नाळकांड्या सापडल्या. या नळकांड्यांसोबत मुले खेळत असताना एक नळकांडी फुटल्याने या परिसरामध्ये बॉम्ब सदृश्य नळकांड्या सापडल्याची माहिती उरण, मोरा पोलीस ठाण्यास देण्यात आली. पोलिसांनी सदर घटनेची माहिती घेतली असता माणकेश्वर समुद्र किनारी अनेक नळकांड्या पडून असल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नळकांडयांची तपासणी केली असता सदरच्या बॉम्ब सदृश्य नळकांड्या ह्या मोठ्या जहाजावरील सिग्नल फ्लायर असल्याचे स्पष्ट केले. यामुळे येथील परिसरामधील तणाव निवळला आहे. मात्र या सर्व प्रकाराबाबत सदरच्या कांड्या ह्या येथील किनारी भागात आल्या असून, नागरिकांनी अशाप्रकारच्या वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आव्हान मोरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी केले आहे.
पिरवाडी ते माणकेश्वर हा मोठा समुद्रकिनारा असून, हा किनारा थेट अरबी समुद्राशी जोडलेला असल्याने, मोठ्या जहाजांमधून फेकण्यात येणाऱ्या वस्तू थेट येथील समुद्र किनारी येत असतात. काहीवेळा महत्वाच्या आणि किमती वस्तू या किनाऱ्यावर लागत आहेत. येथील रहिवासी देखील अशा वस्तू किनाऱ्यावर आढळल्या की त्या उचलण्यासाठी पुढे असतात. यातून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तरी अशा कोणत्याही वस्तुंना हात लावण्यापूर्वी तेथील जनतेने योग्य ती खबरदारी घेत नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जेणेकरून दुर्घटनेपासून बचाव करणे शक्य होईल.