भाईंदर (वार्ताहर) : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊनमुळे मजूर मिळत नसल्याची कारणे देत नालेसफाईच्या कामात बालकामगारांना जुंपणाऱ्या ठेकेदाराने यावर्षी सुद्धा शहराच्या नालेसफाईची जबाबदारी बाल कामगारांवर सोपविली आहे. बाल कामगार ठेवल्याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, त्यांची देयके तत्काळ रोखण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हरेश सुतार यांनी केली आहे. तरीसुद्धा महापालिका प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करत आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेने शहरातील नाल्यांची मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केलेला आहे. महापालिका क्षेत्रात ८५ पक्के नाले तर ७० कच्चे नाले असे १५५ नाले आहेत. नालेसफाईसाठी २ बोट पोकलन, २ हायड्रॉलीक पोकलन तसेच २ मोठ्या पोकलन या सामग्रीचा वापर तसेच रोज शेकडो मजुरांच्या साहाय्याने काम सुरू झाले आहे.
ठेका देताना महापालिकेने ठेकेदाराला काही अटीशर्ती ठेवल्या होत्या त्यानुसार बाल कामगारांना कामावर ठेवू नये तसेच नाल्यातून काढलेला कचरा, घाण रस्त्यावर न टाकता महापालिकेने निर्धारित केलेल्या जागीच टाकावे. असे असताना सुद्धा अनेक ठिकाणी बाल कामगार काम करत आहेत. बाल कामगारांना खोल गटारात उतरून त्यांच्याकडून धोकादायक कामे व इतर श्रमाची कामे करून घेतली जात आहेत. बाल कामगार ठेवल्याबाबत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, त्यांची देयके तत्काळ रोखण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हरेश सुतार यांनी केली आहे.