Monday, January 13, 2025
Homeक्रीडाराजस्थान-दिल्लीत कोण ठरणार शेर?

राजस्थान-दिल्लीत कोण ठरणार शेर?

विजय मिळविण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक

मुंबई (प्रतिनिधी) : यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा आमने-सामने येणाऱ्या राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवारी क्रिकेटचे युद्ध होणार असून दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. रॉयल्स प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करतील, तर कॅपिटल्स त्यांचे हंगामातील आव्हान कायम ठेवण्यासाठी उत्सुक असेल. दिल्लीसाठी प्लेऑफचा रस्ता तितकासा सोपा नाही. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिल्लीला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागेल. या मोसमात दोन्ही संघांनी एक सामना खेळला असून त्यात राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी विजय मिळवला होता. दिल्ली कॅपिटल्स ५ विजय नोंदवून १० गुणांसह गुणतालिकेत केवळ नेट रनरेटमुळे पाचव्या स्थानावर विराजमान आहेत. त्यांच्यानंतर असलेल्या हैदराबाद, कोलकाता आणि पंजाबचेही समसमान १० गुण आहेत; परंतु कमी नेट रनरेटमुळे ते तालिकेत खालील स्थानी आहेत. याचा अर्थ हा पराभव दिल्लीला थेट खाली ढकलू शकतो व अंतिम चारमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नाला सुरुंग लावू शकतो.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने ७ सामने जिंकले असून ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. विजयी झाल्यास ते नेट रनरेटच्या आधारे ते दुसऱ्या स्थानी झेप घेऊ शकतात, तर पराभूत झाल्यास ४थ्या स्थानी असलेल्या बंगलूरुइतके १४ गुण असले तरी नेट रनरेटच्या आधारे तिसऱ्याच स्थानी राहतील, अशी आशा आहे. त्यामुळे एका पराभवाने त्यांना विशेष फरक पडणार नसला तरी ४थ्या स्थानासाठी असलेल्या चुरशीच्या स्पर्धेमुळे त्यानंतरचे दोन्ही सामने त्यांना जिंकणे गरजेचे राहतील. रॉयल्स आणि कॅपिटल्स यांच्यात आयपीएलमध्ये एकूण २५ सामने खेळले गेले असून यात दिल्लीने १२, तर राजस्थानने १३ सामने जिंकले आहेत. गेल्या पाच सामन्यांत, राजस्थानने दोन सामने, तर दिल्लीने तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये स्पर्धा अटीतटीची आहे.

दिल्लीला गत सामन्यात चेन्नईकडून दणदणीत पराभव पत्करावा लागला आहे. ज्यात संघाचे फलंदाजी विभाग पूर्णपणे अपयशी ठरले. तसेच गोलंदाजांनी चेन्नईविरुद्ध भरपूर धावाही दिल्या. दिल्लीसाठी कर्णधार पंतचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे, तर कुलदीप यादवची फिरकीही गेल्या दोन सामन्यांमध्ये फ्लॉप ठरली आहे. आतापर्यंत दिल्लीने पृथ्वी शॉ ते मनदीप सिंग आणि श्रीकर भरतला वॉर्नरचा जोडीदार म्हणून आजमावले आहे. पण तरीही त्यांना वॉर्नरसाठी योग्य सलामीचा जोडीदार सापडलेला नाही. त्यात पृथ्वी शॉ तापामुळे रुग्णालयात दाखल होता; जर तो तंदुरुस्त असेल, तर त्याचे पुनरागमन निश्चित आहे.

दुसरीकडे, राजस्थानने त्यांच्या मागील सामन्यात पंजाबविरुद्ध शानदार विजय मिळवला होता. या संघाचा मजबूत भाग म्हणजे त्यांचे गोलंदाजी आक्रमण. संघात चहल आणि अश्विन हे आयपीएल इतिहासातील दोन सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे त्यांचे फलंदाजी आक्रमण बटलरभोवतीच फिरत असल्याचे दिसते. गेल्या सामन्यात देवदत्त पडिक्कलच्या जागी यशस्वी जयस्वालला सलामीची संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करत त्याने अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. भविष्यातही त्याच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे.

पंतकडून धमाकेदार कामगिरीची अपेक्षा

राजस्थान रॉयल्सला दिल्लीविरुद्धची विजयी मालिका कायम राखायची आहे. अशा स्थितीत हा सामना जिंकण्यासाठी कॅपिटल्सला निश्चितपणे त्यांचा कर्णधार रिषभ पंतकडून अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे, पंतची रॉयल्सविरुद्ध कामगिरी धमाकेदार आहे. रॉयल्सविरुद्ध अवघ्या आठ सामन्यांत पंतने ५७.३३ च्या सरासरीने चार अर्धशतकांसह ३४४ धावा केल्या आहेत. या मोसमात पंत फॉर्ममध्ये दिसत नाही तसेच त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नसले, तरी राजस्थानविरुद्धच्या या अटीतटीच्या सामन्यात तो त्याची सर्वोत्तम कामगिरी करून पुनरागमन करू शकतो.

ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम वेळ : रात्री ७.३० वाजता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -