Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरसमुपदेशन करून संसार जोडण्यात ‘भरोसा सेल’ला यश

समुपदेशन करून संसार जोडण्यात ‘भरोसा सेल’ला यश

अनिकेत देशमुख

भाईंदर : मीरा-भाईंदर शहराची वाढती लोकसंख्या व महिला हिंसाचार/कौटुंबिक हिंसाचार याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देणे, त्यांचे समुपदेशन करून मानसिक आधार देणे व त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे याकरीता मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते ‘भरोसा सेल’चे उद्घाटन करण्यात आले आहे.

लोकांचे संसार तुटू नयेत याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या कृती ‘भरोसा सेल’ राबवत आहे. त्यात अनेक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेऊन लोकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. शहरात ७ वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम घेऊन ७५० महिलांना जागरूक करण्यात आले आहे. ‘भरोसा सेल’मध्ये तक्रार अर्ज आल्यानंतर दोन्ही जोडप्यांना बोलावले जाते. त्यांनतर त्यांना काही काळ बोलण्याकरिता एकांत दिला जातो. तरुण मुले-मूली असतील, तर त्यांना एकमेकांच्या प्रेमाच्या आठवणी आठवण करून देण्यासाठी प्रेमगीत ऐकवली जातात. त्यांना एकमेकांच्या सोबत वेळ देता यावा व आपापसांतील दूरावा दूर करता यावा याकरता त्यांना सिनेमा तिकिट अथवा जेवणासाठी बाहेर पाठवले जाते. लोकांचे संसार कशा प्रकारे टिकून राहतीलम याचा प्रयत्न ‘भरोसा सेल’ करत आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या संकल्पनेतून ‘भरोसा सेल’ मार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी ‘महिला/ बालके व ज्येष्ठ नागरिक यांचे हक्क व अधिकार’ या पुस्तकाचे संकलन करून ते प्रकाशित करण्यात आले असून ‘भरोसा सेल’ येथे ते मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती ‘भरोसा सेल’च्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी दिली.

‘भरोसा सेल’च्या कार्यालयात एकाच छताखाली पीडित महिला व बालक यांना विविध सेवा पुरवून त्याद्वारे त्यांना मानसिक बळ देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘भरोसा’ या एकात्मिक बहुउद्देशीय सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. भरोसा सेलला सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले असून मागील एका वर्षात जवळपास एकूण २४८ तक्रारअर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी समुपदेशन करून १२८ जोडप्यांचे संसार जोडण्यास भरोसा सेलला यश प्राप्त झाले आहे.भरोसा सेलमध्ये तक्रारअर्ज दाखल आल्या नंतर सदर तक्रारी अर्जातील अर्जदार व गैरअर्जदार यांना समक्ष भरोसा सेल येथे बोलावून समुपदेशन समितीमार्फत त्यांचे समुपदेशन घडवून आणण्यात येते. समुपदेशन करण्यासाठी समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तीदेखील कोणत्याही प्रकारची फी न घेता पोलिसांना मदत करत आहेत. यात ३ वकील, २ डॉक्टर, काही एन.जी.ओ यांचा देखील समावेश आहे.

एकूण २४८ तक्रारअर्जांमधून १२८ आपापसांत समझोता झाल्याने त्या तक्रारींचे निवारण झाले आहे.तर इतर प्रकरणे संबंधित पोलीस ठाणे येथे समूपदेशन करून पुढील कार्यवाहीकरिता पाठवण्यात आले आहेत. उर्वरित प्रकरणांत समुपदेशन सुरू असल्याची माहिती भरोसा सेलच्या मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी शिंदे यांनी दिली आहे.

भरोसा सेल या उपक्रमाबाबत नागरिकांमध्ये अधिक जागरूकता होणे आवश्यक आहे. कोर्टाची पायरी चढण्याअगोदर भरोसा सेलच्या मदतीने समुपदेशन करून अनेक प्रकरणे सोडवता येऊ शकतात.शहरातील अनेक लोकांना याबाबत अद्याप माहिती नसल्याने बहुतांश लोक भरोसा सेलकडे न जाता कोर्टाची पायरी चढतात व यामुळे अनेकांना आपले संसार गमवावे लागले आहेत. भरोसा सेलच्या मदतीने प्रकरण सोडवल्यास माणसाचे पैसे, वेळ, मानसिक ताण, सर्व काही वाचणार आहे. त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे न घाबरता भरोसा सेलचा फायदा घ्यावा. अनेक कोटुंबिक प्रकरणात भरोसा सेलच्या माध्यमातून समुपदेशन घडवून त्यांचे संसार पुन्हा एकदा सुरळीत होण्यास हातभार लागला आहे.वयात येणाऱ्या अनेक मुलांचे प्रश्न त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करून सोडवण्याचा प्रयत्न भरोसा सेल करत आहे. गेल्या वर्षभरात अनेकजणांचे तुटायला आलेले संसार समुपदेशन करून भरोसा सेलने पुन्हा जोडले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -