Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरडहाणूत उन्हाळी भातशेती कापणीला सुरुवात

डहाणूत उन्हाळी भातशेती कापणीला सुरुवात

पावसाळ्यातील वादळवाऱ्यांच्या धोक्यामुळे उन्हाळी भातशेतीला प्राधान्य

डहाणू (वार्ताहर) : सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडास या धरणांमधून उजव्या व डाव्या कालाव्याने अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. या कालव्यातील पाण्यावर उन्हाळी शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने भातशेती केली जात असून, भाजीपाला, फुलझाडांचीही लागवड केली जाते.

पावसाळी भातशेतीपेक्षा उन्हाळी भातशेती ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या उन्हाळी भातशेतीच्या कापणीला सुरुवात झाली आहे. यावेळी भाताचे उत्पादन भरघोस निघाले आहे, असे येथील शेतकरी सांगत आहेत. उन्हाळी भातशेतीला पावसाळी शेतीप्रमाणे अतिवृष्टी, वादळवाऱ्याचा त्रास नसल्यामुळे उन्हाळी भातशेती चांगले उत्पादन देते. सोबत भाताची पावलीही खराब होत नसल्यामुळे तिलाही चांगला भाव मिळतो.

कासा, चारोटी, सारणी, उर्से, चिंचपाडा, वांगर्जे, सुर्यानगर, वाघाडी, धरमपूर व इतर भागात जिथून पाट-कालवे गेले आहेत. तिथे दुबार भातशेती केली जाते. मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी व समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आलेल्या वादळामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हतबल झाला होता. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गकोपाने हिरावून नेला होता. परंतु यंदाच्या उन्हाळी उत्पादनाने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार असल्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

भातशेतीपाठोपाठ कालव्याच्या पाण्यावर अनेक ठिकाणी भाजीपाला लागवडही केली जात आहे. डहाणू तालुक्यातील शेतकरीवर्ग देखील आता भाजीपाला लागवडीकडे वळताना दिसत आहे. उन्हाळ्यात मिरची, गवार, वांगी, दुधी, मोगरा, झेंडू असे उत्पादन शेतकरी घेत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -