Friday, December 13, 2024
Homeमहामुंबईसरपंच, सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ

सरपंच, सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास १ वर्षाची मुदतवाढ

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका माहे जानेवारी २०२१ मध्ये पार पाडण्यात आल्या आहेत. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात पुनश्च एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सबब जात वैधता प्रमाणपत्र १७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करण्याबाबतची घोषणा ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे. मात्र वेळेत जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित राहू नये यासाठी सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ असा करून निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

त्या अनुषंगाने जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी पडताळणी समितीकडून दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२२ असा होता. तथापि माहे जानेवारी २०२१च्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राखीव प्रवर्गातून उमेदवार निवडून आले आहेत. त्यात राज्यातील कोव्हिड-१९ च्या निर्बंधामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंच, सदस्यांना पदापासून वंचित राहू नये यासाठी विशेष बाब म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -