मुंबई (प्रतिनिधी) : उन्हाळ्यात लोकल प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करता यावा यासाठी रेल्वेने काही दिवसांपूर्वी एसी लोकलचे तिकीट दर कमी केले आहेत. त्यानंतर मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. मात्र यामुळे आता हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद होण्याची शक्यता आहे.
हार्बर मार्गावरील एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. मात्र यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/कसारा/कर्जत या मुख्य मार्गावरील वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाल्याने हार्बर मार्गावरील एसी ट्रेन बंद करून त्या मुख्य मार्गावर चालवण्यात येणार असल्याचे समजते. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर हार्बर मार्गावर एसी लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद केल्या जाण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात ८ तारखेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वेमधून दररोज सरासरी २८ हजार १४१ प्रवाशांनी प्रवास केला. यातील मुख्य मार्गावरील प्रवासी संख्या २४ हजार ८४२ होती तर हार्बर मार्गावरील प्रवासी संख्या ३ हजार २९९ इतकी होती. तिकीट दर कमी झाल्याने प्रवाशांच्या संख्येत जवळपास ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर सुट्टीच्या दिवशी तसेच रविवारी सुद्धा एसी ट्रेन चालवण्यात येतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे, तर ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल फेऱ्या बंद करण्यात आल्या असून सीएसएमटी ते पनवेल, गोरेगाव दरम्यानच्या ३२ एसी ट्रेनपैकी १६ फेऱ्या बंद करून त्याऐवजी सामान्य गाड्या सोडण्यात आल्या आहेत.