मीनाक्षी जगदाळे
सोनीला (काल्पनिक नाव) घेऊन संजय (काल्पनिक नाव) परत दुसऱ्या भाड्याच्या घरात राहू लागला. कार्यालयीन कामकाज सांभाळून दोघेही अनैतिक संबंध ठेऊन उघड उघड एकत्र राहत होते. सोनी दुसऱ्या शहरातील असल्यामुळे तिच्या घरच्यांना या गोष्टीचा थांगपत्ता देखील नव्हता. ते याच समजुतीत होते की, आपली मुलगी नोकरी करून हॉस्टेलला राहाते आहे. संजयच्या घरचे सर्वजण त्याच्या गावी राहत असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कोणताही हस्तक्षेप करणे शक्य नव्हते आणि बायको माहेरी गेल्यामुळे संजयच्या घरच्यांना तो जुमानेल, असे काही वाटत नव्हते. तरीही त्यांच्या पद्धतीने त्यांनी सोनीचा नाद सोडण्याबाबत संजयला सांगितले असता त्यांना प्रचंड अपमानाला सामोरे जावे लागले होते.
समुपदेशन दरम्यान संजय सांगत होता की, त्यावेळी त्याला सोनीशिवाय काहीही महत्त्वाचे नव्हते. ती अविवाहित होती, तिला माझ्याशी लग्न करायचे होते, ती लग्नासाठी माझ्या खूप मागे लागली होती. त्यामुळे मी मंदिरात तिच्याशी लग्न केले. तसेच माझे नाव तिला वापरता यावे म्हणून मी तिची अनेक कागदपत्रे माझ्या नावाने बनवली. माझे सर्व आर्थिक व्यवहार मी सोनीच्या ताब्यात दिले. सोनी आता संपूर्ण घर, सर्व व्यवहार तिच्या ताब्यात असल्यामुळे हवा तसा पैसा वापरू शकत होती. तिला हवे ते खरेदी करणे, टूर्सला जाणे, हॉटेलिंग, तिच्या आई-वडिलांना पैसे पुरवणे हे सर्व तीच निर्णय घेत होती. मला ती कामात पण मदत करीत असल्यामुळे मला या खर्चाचे तेव्हा जास्त काही विशेष वाटत नव्हते; परंतु माझा एक रुपया पण बचत होत नव्हता. मला घरचे व्यवस्थित जेवण कधी मिळत नव्हते. घरात अमाप नासधूस उधळमाधळ सुरू होती, जी माझ्या पत्नीच्या काळात मला कधीच दिसली नव्हती. सोनीसोबत एकत्र राहायला लागल्यापासून संजयचेदेखील खर्चावरील नियंत्रण कोलमडले होते. सोनीने प्रचंड अट्टाहास करून त्याला देश-विदेशातील पर्यटन करायला भाग पाडले होते. सातत्याने बाहेरील खाणे, वेळीअवेळी खाणे यातून संजयची प्रकृती बिघडत होती. एक दोन वेळा संजयला चांगल्याच गंभीर आजारांना सामोरं जावं लागलं होते.
व्यावसायिक कामासाठी वापरण्याचे पैसे अनेकदा सोनीच्या हट्टांवर खर्च होत होते आणि त्यातून संजय कर्जबाजारी होत होता. दर वेळी घरमालकांना हे पती-पत्नी नाहीत, अनैतिक संबंध आहेत, असे समजल्यामुळे दोघांची हकालपट्टी होत होती. सातत्याने भाड्याने नवीन ठिकाणी नवीन घर शोधणे, त्यासाठी होणारी धावपळ, डिपॉझिट, एजन्टचे कमिशन, भाडे याचा खर्च, सामानाचे ट्रान्सपोर्ट हे अनाठायी खर्च वाढले होते. संजयच्या सांगण्यानुसार सोनीसोबत राहत असतानाच त्याला वडिलोपार्जित मालमत्तेमधील हिस्सा म्हणून अतिशय सुंदर आणि मोठा बंगला मागील चार वर्षांपूर्वी मिळाला होता. त्यानंतर तर सोनीने नवनवीन व्यावसायिक कल्पना राबविणेसाठी संजयला त्या घरावर मोठ्या रकमेचे कर्ज घ्यायला भाग पाडले होते. अजूनही सोनीच्या प्रेमात संजय इतका आंधळा होता की, आपण स्वतःचे किती नुकसान करून घेत आहोत याची त्याला अजिबात तमा नव्हती. या नवीन बंगल्यात तर सोनीच मालकीण बनून राहत होती. तिने भावनिक करून, दडपण आणून संजयला त्याच्या पत्नीला फारकतीची नोटीस पाठवायला भाग पाडले होते. त्यामुळे संजयचे सासुरवाडीशी देखील संबंध बिघडून गेले होते. एव्हाना सोनीच्या घरी हे प्रकरण माहिती झाले होते आणि मिळालेल्या नवीन बंगल्याच्या लालसेपोटी आता सोनीच्या घरचे देखील संजयला धमकवायला लागले होते. आमची मुलगी काय अशीच वापरणार का, तिला असेच ठेवणार का, तिच्याशी लग्न कर अन्यथा, तुझी पोलीस तक्रार करू, तिला लग्नाचे आमिष दाखवून तू तिच्यावर अनेक वर्ष जबरदस्ती करीत आहे, अशी तक्रार तुझ्यावर ठोकू, तुझं करिअर बरबाद करू यांसारख्या धमक्या संजयला मिळायला लागल्या होत्या.
एक दोन वर्षेसुद्धा संजय बंगल्यावर घेतलेल्या कर्जाचे हफ्ते नियमित न भरू शकल्यामुळे, हौसमौज, हिंडणे फिरणे, उधळपट्टी सोनीने अजिबात कमी न केल्यामुळे इतर उधारी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. संजयचे व्यावसायिक नुकसान देखील खूप होऊ लागले होते आणि अखेरीस सर्व कर्ज फेडण्यासाठी संजयला आयता मिळालेला दीड कोटींचा बंगला विकून टाकावा लागला होता.
या सर्व बारा वर्षांच्या कालावधीमधील अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी संजयने सांगितली होती, ती खूपच वेदनादाई होती. संजयने सांगितलं दोघे एकत्र राहत असतांना अनेकदा संजयने सोनीला इतर पुरुषाशी, मुलांशी बोलताना, मेसेज करताना, फोटो व्हीडिओ शेअर करताना पकडले होते. दरवेळी सोनी त्याला वेगवेगळी कारणे सांगून, त्याची माफी मागून, रडून परत त्याची सहानुभूती मिळवून स्वतःच्या प्रेमात ओढत होती. पाच-सहा वेळा सोनीची प्रेमप्रकरणे पकडूनसुद्धा संजय कोणतीही कठोर भूमिका घेऊ शकला नव्हता. संजय सर्व बाजूने एकटा पडलेला होता. विशेष म्हणजे समुपदेशनाला आलेला संजय सांगत होता, आता काही महिन्यांपूर्वी सोनीने स्वतःचा नवाकोरा फ्लॅट घेतला आहे आणि तिथे ती दुसऱ्याच व्यक्तीसोबत राहाते आहे. संजयला पूर्णतः कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक बाबतीत बरबाद करून सोनी कायमची सोडून गेली होती आणि दुसऱ्याच व्यक्तीसोबत आता पुढील आयुष्य व्यतीत करणार होती…