मिरा रोड (वार्ताहर) : नवघर पोलिस ठाणे हद्दीत एक बांगलादेशी नागरिक विनापरवाना वास्तव्य करत असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नवघर पोलीस ठाण्यातील दहशतवादविरोधी कक्षाला एक बांगलादेशी नागरिक भाईंदर पूर्वेला येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक गॅस गोडाऊन येथे गेले असता एक संशयित इसम त्यांना दिसला. त्याची चौकशी केली असता तो बांगलादेशी असल्याचे त्याने कबूल केले.
त्याचे नाव अब्दुल्ला वजेद गाजी (२४) असे असून तो बांगलादेशातून गरिबी, उपासमारी व बेरोजगारीला कंटाळून भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून पश्चिम बंगालमार्गे मुंबईत आला होता. तो गेल्या ६ महिन्यांपासून गणेश देवल नगर, भाईंदर पश्चिम येथे राहत आहे.
कंपन्यांमध्ये लेबर काम करून उदरनिर्वाह करत असल्याचे त्याने सांगितले. त्याने बांगलादेशी असल्याचे कबूल केले असून तो भारतीय असल्याचे कोणतेही कागदपत्र दाखवू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.