मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे पश्चिम बॅन्डस्टँड परिसरातील ताज हॉटेल शेजारी असणाऱ्या सरकारी मालकीचा भूखंड बिल्डरच्या घशात घालून सुमारे तीन हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या पंचतारांकित जागेवर “एसआरए” योजना दाखवून एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय बिल्डरला देण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केला.
आशीष शेलार यांनी ५ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन हा भूखंड घोटाळा उघड केला होता. त्यावेळी त्यांनी या प्रकरणात १ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत खुलासा उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी करून यामध्ये कोणत्याही प्रकारे घोटाळा झाला नसल्याचे प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. त्या खुलाशाला आज उत्तर देणार नाही, योग्य वेळी आपण त्यावर बोलू असे सांगत आमदार अॅड. आशीष शेलार यांनी मंगळवारी पुन्हा दादर वसंत स्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याच घोटाळ्यातील आणखी एक गंभीर बाब उघड करून नवीन आरोप केले आहेत.
आशीष शेलार म्हणाले की, या भूखंडावर १६८ कायमस्वरूपी संक्रमण शिबिरातील घरे बिल्डर बांधून देणार, असे दाखवून या मोकळ्या भूखंडावर एसआरए योजना राबविण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संक्रमण शिबिराच्या नावाखाली विकासकाला एसआरए योजनेचे फायदा देण्यात येणार आहेत.