Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रठाणे१८ लाख ७२ हजारांचे मोबाईल लंपास करणाऱ्याला दोन तासात अटक

१८ लाख ७२ हजारांचे मोबाईल लंपास करणाऱ्याला दोन तासात अटक

उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगरमध्ये साऊंड ऑफ म्युझिक हे मोबाईलचे दुकान फोडून एका चोरट्याने तब्बल १८ लाख ७२ हजार रुपयांचे मोबाईल चोरी केले होते. या आरोपीला मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या २ तासात अटक करत त्याच्याकडून सर्व मोबाईल जप्त केले आहेत. हा चोरट्या अय्याशीसाठी मोबाईल चोरायचा अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यानी दिली.

उल्हासनगर कॅम्प ३ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साऊंड ऑफ म्युझीक नावाचे मोबाईल दुकान आहे. अज्ञात चोरटयाने पहिल्या मजल्यावरील छतास असलेली कंम्पोझीट शिट तोडुन त्यावाटे दुकानात प्रवेश करून दुकानामधील अठरा लाख बहात्तर हजार रूपये किंमतीचे असलेले आयफोन, ॲपल, सॅमसंग कंपनीचे एकुण ३० मोबाईल सोमवारी रात्रीच्या सुमारास घरफोडी करून चोरी केल्याची फिर्याद राकेश लक्ष्मणदास गंबानी यांनी दाखल केली होती.

चोरी केल्यानंतर रात्रभर चोरटा हा उल्हासनगर रेल्वे स्टेशन वर झोपला. सकाळी तो चोरी केलेल्या मोबाईलची बॅग घेऊन निघाला असता त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे बिट मार्शल क्रमांक ३ चे पोलीस अंमलदार पोलीस नाईक, अशोक मोरे व पोलीस शिपाई राजेंद्र कोंगे यांची नजर पडली. उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील संजय गांधी नगर येथून त्याला ताब्यात घेवून त्याच्याकडील बॅगेची पाहणी केली असता त्यात चोरीस गेलेले मोबाईल मिळुन आले.

ह्या इसमास ताब्यात घेवून त्याला गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सखोल तपास केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक इश्वर कोकरे, पोलीस उप निरीक्षक मंगेश जाधव, पोलीस हवालदार गुलाबसिंग लिकडे, विजय जिरे, दत्तू जाधव, पोलीस नाईक अशोक मोरे, दिपक पाटील, प्रविण पाटील, पोलीस शिपाई राजेंद्र कोंगे, बाबासाहेब ढाकणे, संजय पालवे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा सदर इसमाचे नाव महम्मद फिरोज नईम अहमद खान उर्फ मोनु असे असून तो अंबरनाथ मधील मोहन सबरबीया मधील नॅनो सीटी मध्ये रहायला असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी त्याने अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ लाखांचे मोबाईल लंपास केले होते. त्या गुन्हयात कारागृहात ८ महिने शिक्षा भोगून जामिनावर त्याची सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा उल्हासनगरमधील साउंड ऑफ म्युझिक दुकान फोडले आहे.

पोलिसांनी काढली आरोपीची धिंड

महम्मद फिरोज नईम अहमद खान उर्फ मोनु हा सराईत आरोपी आहे. हा वारंवार असे गुन्हे करीत असल्याने त्याला धडा शिकविण्यासाठी त्याची मध्यवर्ती पोलिसांनी धिंड काढली आहे. पोलिसांनी त्याची धिंड काढल्याने इतर आरोपींच्या मनात धडकी भरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -