प्रा. प्रवीण पांडे
यंत्रमानवांच्या प्रदेशात आताचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे. तसेच या प्रांतात रोजच काहीतरी नवीन शोध लागत आहेत. त्यापैकीच यंत्रमानव ही विज्ञान व तंत्रज्ञानाची एक फार मोठी किमया आणि उपलब्धी आहे. आणि याबद्दल शिक्षण मिळण्याकरिता रोबोटिक्स इंजिनीअरिंग ही शैक्षणिक शाखा उपलब्ध आहे.
रोबोट म्हणजे काय? तो कसे काम करू शकतो? त्यामध्ये वापरले जाणारे भाग कोणते असतात? त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाते? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होतात. अतिशय सोप्या शब्दांत सांगायचे तर रोबोट म्हणजे संगणक (कॉम्प्युटर), यांत्रिक भाग (Mechanical Parts), कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) व संगणक आज्ञावली (Computer Programs) या मुख्य घटकांची, जुळवणी करून तयार झालेले यंत्र, जे दिलेल्या सूचनेनुसार त्याच्या जवळ उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारे अनेक कामे पार पाडू शकते.
(या लेखात आपण विज्ञानिक भाषेमधील किंवा तांत्रिक व्याख्यांपेक्षा विषय समजून घेण्यावर जास्त प्रकाश टाकूयात). तसे पाहता रोबोट हे अनेक प्रकारचे आहेत, असतात. त्यांच्या कार्य क्षमतेप्रमाणे तसेच
कार्यक्षेत्रनुसार त्यांची विभागणी केली जाते. आता यंत्र मानवाचा वापर करायचा, त्यावर नियंत्रण ठेवायचे, तर त्याकरिता काही नियम ठरविण्यात आलेले आहेत.
पहिला नियम : रोबोटने कोणत्याही मनुष्य प्राण्यास इजा करता कामा नये.
दुसरा नियम : मानवाने दिलेल्या आज्ञांचे पालन रोबोटने केले पाहिजे; परंतु अशी आज्ञापालन करीत असताना पहिल्या नियमाचे उल्लंघन होता कामा नये.
तिसरा नियम : रोबोटने स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करावे; परंतु हे करीत असताना पहिल्या व दुसऱ्या नियमाचे उल्लंघन होणार नाही.
रोबोटसची संरचना : रोबोट म्हणजेच यंत्रमानव हे अतिशय क्लिष्ट असे यंत्र आहे. त्यामुळे त्याची संरचना देखील क्लिष्ट असते. पण आपण ती सोप्या व सहज पद्धतीने समजून घेऊया.
यामध्ये असणाऱ्या घटकांमधील काही अति महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत.
- यांत्रिक जुळवणी-रोबोटसच्या यांत्रिक जुळवणीमध्ये पुढील भाग असतात. दाते असणारी काटेरी चाके (Gears, Wheels), यांत्रिक सांधे (Arms) तसेच काही जोडण्या (लिंक्स) इत्यादी.
- कार्य वाहन प्रणाली व संदेश वहन प्रणाली (Actuators and Transmission)
- साधने यांत्रिक जुळवणी आणि इलेक्ट्रॉनिक मंडले (Electrinic Circuits) यांच्यामध्ये जी साधने दुवा म्हणून वापरली जातात त्यांना Actuators असे म्हटले जाते. तसेच ह्यामध्ये जोडल्या जाणाऱ्या वायर्स, केबल्स, जंपर्स (बसेस) इत्यादी जुळवणी करणाऱ्या भागांना Transmission Lines असे म्हटले जाते.
- (Sensors) अनेक प्रकारचे सेन्सर्स ह्यात वपरावे लागतात. ह्या सेन्सर्सची कार्ये वेगवेगळी असतात. ह्या सेन्सर्सचे काही प्रकार लाइट सेन्सर्स, I R सेन्सर्स, touch सेन्सर्स, अलेता सोनिक सेन्सर्स असे अनेक प्रकार आहेत.
- (Motors) रोबोटमध्ये वेगवेगळ्या मोटर्सचा उपयोग केला जातो. Dc motor, steper motors. ह्या मोटर्स रोबोटच्या अनेक हालचाली करण्याकरिता वापराव्या लागतात.
- (Piwer Source) आवश्यक असणारा ऊर्जा स्त्रोत हे यंत्र अनेक तांत्रिक सुटे भाग, मोटर्स, इलेक्ट्रॉनिक सर्किटस् , सेन्सर्स आणि आज्ञावली अश्या अनेक घटकांचे एकत्रीकरण आहे. ह्या सर्व घटकांना चलित करण्याकरिता त्याला ऊर्जा ही अत्यावश्यक आहे. ही ऊर्जा त्याला विजे द्वारे किंवा बॅटरी द्वारे, अथवा सौर ऊर्जा किंवा अजून जी काय व्यवस्था असेल, त्याद्वारे पुरवावी लागेल.
- मनुष्य आणि रोबोट ह्या मधील दुवा तसेच आवश्यक असणारी आज्ञावली. (User Interface and software)
हे तर फार महत्वाचे घटक आहेत. कारण मानवास रोबोटस सोबत संपर्क साधायचा असेल, त्याला काही आज्ञा द्यावयाची असेल तर ह्या दोघांमध्ये काहीतरी दुवा वापरावाच लागेल. तसेच ह्या अद्भुत यंत्राने आपल्या सूचनेबरहुकुम काम सुचारू पणे करायचे असेल तर त्याकरिता त्याला विशिष्ठ प्रकारची आज्ञावली असावी लागेल, जी ते यंत्र समजून घेवून त्या प्रमाणे कार्य करू शकेल.
तर मित्रांनो ही आहे रोबोटस बद्दल प्राथमिक ओळख.
आज मोठ मोठ्या कारखान्यांमधून अनेक कामे करण्याकरिता रोबोटस चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर चला व्हा तय्यार ह्या नव्या युगाचे आव्हान स्वीकारायला.
भेटू या ह्या लेख मालिकेतील पुढील लेखात.